पिंपरी-चिंचवड : कार्तिकी एकादशी वारीला निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत भरधाव कंटेनर शिरल्याने महिला वारकऱ्याचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी ६ च्या सुमारास घडली आहे. प्रियांका तांडेल वय- ५५ वर्षे असे मृत झालेल्या महिला वारकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उरण येथून आळंदीच्या कार्तिकी वारीसाठी श्री दावजी पाटील दिंडी निघाली होती. कामशेत घाटात सकाळी पायी दिंडी असताना चालकाचे नियंत्रण सुटलेला भरधाव कंटेनर दिंडीत शिरला. आरडाओरडा झाला. कंटेनरने वारकऱ्यांना धडक दिली. घटनेत वारकरी महिलेचा मृत्यू झाला असून आठ वारकरी जखमी आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ही घटना जुना पुणे-मुंबई महामार्गावर घडली. अपघातानंतर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. काही वेळानंतर वाहतूक सुरळीत झाली.