पुणे : ऑनलाईन बुकिंगच्या माध्यमातून वाहतूक सेवा देणाऱ्या ओला, उबर, रॅपिडोसारख्या खासगी कंपन्या आणि रिक्षाचालकांना अंतरानुसार प्रवासी दर निश्चित करून दिले आहे, तरी गेल्या दोन दिवसांपासून सेवा देणाऱ्या चालकांकडून प्रवाशांना जादा पैसे मागितल्याचे, तसेच रिक्षाचालक मीटरद्वारे सेवा न देता अवाजवी पैशांची मागणी करून प्रवाशांची अडवणूक केल्याचे प्रकार समोर आले. त्या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) प्रवाशांना ‘आरटीओ’ कार्यालयात तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाची संततधार सुरू असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. कामानिमित्त बाहेर पडलेले किंवा ज्येष्ठ, महिला प्रवासी नियोजित ठिकाणी जाण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करून वाहतूक सेवेला प्राधान्य दिले. मात्र, चालकांकडून सेवा रद्द करण्यासारखे प्रकार घडले, तर ज्या ओला, उबरचालकांनी सेवा दिली, त्या चालकांनी प्रवाशांकडून वाहतूक कोंडीचे कारण देऊन जादा पैसे आकारल्याचा संताप काही प्रवाशांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केला. अनेक रिक्षाचालकांनी दोन ते तीन किलोमीटर अंतरासाठी २०० ते २५० रुपयांची मागणी केल्याचेही काहींनी सांगितले. ज्येष्ठ आणि महिला प्रवाशांना याचा मोठा फटका बसला.
‘इतर वेळी प्रवाशांची पळवापळवी होत असताना गेल्या दोन दिवसांत पाऊस सुरू असून प्रवाशांकडून जादा पैसे मागणे म्हणजे हा अडवणुकीचाच प्रकार आहे,’ अशी प्रतिक्रिया संदेश मोहिते यांनी समाजमाध्यमावर व्यक्त केली, तर ‘विमानतळावरून बाणेरला जाण्यासाठी ऑनलाईन कॅब आरक्षित केली. परंतु, अर्ध्या तासानंतर संबंधित कॅबचालकाने आरक्षित सेवा रद्द केल्याने वेळ वाया गेला. स्थानिक रिक्षा चालकांना विचारल्यावर त्यांच्याकडून मीटरऐवजी ८०० रुपये लागतील असे उत्तर देण्यात आले. एकाच ठिकाणी दीर्घ काळ थांबावे लागल्याने नाईलाजास्तव ६०० रुपयांमध्ये दुसऱ्या रिक्षातून घर गाठावे लागले,’ अशी प्रतिक्रिया सुलोचना जाधव यांनी दिली.
समाजमाध्यमांवरील या तक्रारींची गंभीर दखल घेऊन आरटीओ अधिकाऱ्यांनी कॅब किंवा रिक्षाचालकांनी अडवणूक केल्यास, तातडीने संबंधित वाहनाचा नंबर आणि नाव नोंद करून आरटीओ कार्यालयात पाठवून तक्रार करावी. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगितले.
पाऊस पडल्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते म्हणून कॅब किंवा रिक्षाचालक प्रवासी सेवा नाकारतात. परंतु, जादा पैसे मागून प्रवाशांची अडवणूक करत असल्यास संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित आहे.– बापू भावे, सल्लागार तथा खजिनदार, स्वारगेट इन गेट एसटी स्टँड रिक्षा संघटना
ओला, उबर, रॅपिडो किंवा कॅब आणि रिक्षाचालकांनी ठरवून दिलेल्या प्रवासी शुल्कानुसार, मीटरदरानुसार प्रवाशांना सेवा द्यावी. तक्रार प्राप्त झाल्यावर कारवाई करण्यात येईल.- स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे