बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून पश्चिम किनारपट्टीवरील वाऱ्यांचा जोर वाढला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्य़ात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच कोल्हापूर, सातारा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मराठवाडय़ात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

गेल्या २४ तासात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मराठवाडय़ात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. सोमवारी दिवसभरात पुण्यात २६ मिलिमीटर, नाशिकमध्ये २१ मि.मी., रत्नागिरीमध्ये १३ मि.मी., औरंगाबादमध्ये ५८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस झाला आहे. दिवसभरात राज्यात सर्वाधिक तापमान सांताक्रु झ येथे ३२.८ अंश सेल्सिअस, तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे १७.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र रविवारी (२० सप्टेंबर) तयार झाले आहे. मोसमी पावसाचा अक्ष सध्या हिमाचलच्या पायथ्याशी आहे. परिणामी ओडिशासह उत्तर भारतातही जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने के रळपासून कोकण किनारपट्टीपर्यंत पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. २२ सप्टेंबरला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्य़ात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यासह कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, रायगड, पालघर, ठाणे, मुंबईतही जोरदार पावसाची शक्यता आहे.