पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील २५ हजार रुपयांहून अधिक थकबाकी असलेल्या ७३ हजार २०७ मालमत्ता धारकांनी त्वरित कराचा भरणा करावा. अन्यथा २४ जुलैपासून मालमत्ता जप्ती मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने दिला आहे. जप्ती पथके तयार ठेवली असून सात दिवसांचा शेवटचा इशारा दिल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.

महापालिकेने मालमत्ता धारकांसाठी ३० जूनपर्यंत संपूर्ण कराचा भरणा केल्यास किमान दहा टक्के व कमाल २० टक्के सवलत दिली होती. या योजनांचा तीन लाखांपेक्षा अधिक मालमत्ता धारकांनी लाभ घेतला. त्यामुळेच पहिल्या तिमाहीत ४४७ कोटींचा कर पालिका तिजोरीत जमा झाला. शहरात ३१ मार्च २०२३ अखेर २५ हजारांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या ७३ हजार २०७ मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडे तब्बल सातशे कोटी रुपयांचा कर थकीत आहे. हा कर वसूल करण्यासाठी विभागाच्या वतीने संदेश, फोन, रिक्षाव्दारे जनजागृती, फलक आणि समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. जप्तीपूर्व नोटीसाही बजावल्या होत्या. त्यामुळे सात हजार २७० मिळकत धारकांनी ६० कोटी ८८ लाख रुपयांचा भरणा केला आहे.

हेही वाचा – पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने तरुणींची फसवणूक

शहरात २५ ते ५० हजारांपुढील २९ हजार १०० मालमत्ता आहेत. यांच्याकडे तब्बल ११० कोटी रुपयांचा कर थकीत आहे. या थकबाकीदारांना २१ जुलैपर्यंत नोटीसा बजावल्या जाणार आहेत. त्यानंतर २४ जुलैपासून एकत्रित जप्ती मोहीम हाती घेण्यात येणार आहे. कर संकलन विभागाचे कर्मचारी, मीटर निरीक्षक, मंडलाधिकारी, सहाय्यक मंडालाधिकारी, जवान यांची पथके सुसज्ज करण्यात आली आहेत. यावेळी मीटर निरीक्षक आणि प्लंबर यांची पथकाला जोड मिळाल्यामुळे जप्ती कारवाई अधिक तीव्र आणि परिणामकारक होणार आहे.

हेही वाचा – पिंपरी पालिका यशवंतराव चव्हाण स्मारकासाठी पाच कोटी रुपये देणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालमत्ता जप्तीची अथवा नळ कनेक्शन तोडण्याची अप्रिय कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता धारकांनी आपला थकीत कर त्वरित भरून पालिकेला सहकार्य करावे. मालमत्ता कराबरोबर पाणीपट्टी वसुली करण्यावर भर राहील. – नीलेश देशमुख, सहाय्यक आयुक्त, कर संकलन व कर आकारणी विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका