फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटचा (एफटीआयआय) हंगामी अध्यक्ष होण्यास त्यावेळी मी तयारी दर्शविली होती, असा गौप्यस्फोट भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी गुरूवारी केला. विद्यार्थ्यांचे आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी तु्म्ही पदाचा राजीनामा द्या, अशी विनंती मी गजेंद्र चौहान यांना केली होती. मात्र, तसे काही घडले नाही आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, असे सिन्हा यांनी सांगितले. एफटीआयआय नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ७ जानेवारी रोजी गजेंद्र चौहान बैठकीसाठी पहिल्यांदाच संस्थेमध्ये आले होते. मात्र, त्यावेळी विद्यार्थ्यांनी एफटीआयआयच्या प्रवेशद्वारावर चौहानांविरोधात घोषणा देत त्यांचा तीव्र निषेध केला होता. यावेळी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसी बळाचा वापर करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर भाष्य करताना सिन्हा यांनी मी संस्थेचा हंगामी अध्यक्ष होण्याची तयारी दर्शविली होती, असे सांगितले. मला तशाप्रकारच्या नियुक्तीचे पत्र द्यावे, अशी मागणीही सिन्हा यांनी त्यावेळी केली होती. या संपूर्ण आंदोलनाच्या काळात काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी एफटीआयआयला भेट दिली होती आणि राष्ट्रपती प्रणब मुखर्जींपुढे याप्रकरणी गाऱ्हाणेदेखील मांडले होते. या तापलेल्या परिस्थितीत हस्तक्षेप करणे योग्य ठरणार नाही, असे आमच्याकडील काही नेत्यांचे मत होते आणि त्यानंतर हा मुद्दा सरकारसाठी प्रतिष्ठेचा झाला होता, असे एफटीआयआयचे माजी विद्यार्थी असणाऱ्या सिन्हा यांनी सांगितले. दरम्यान, गेल्यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात एफटीआयआयचे संचालक प्रशांत पाठराबे यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर मध्यरात्री करण्यात आलेल्या कारवाईचा सिन्हा यांनी निषेध केला.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2016 रोजी प्रकाशित
… त्यावेळी मी एफटीआयआयचा हंगामी अध्यक्ष होण्यास तयार होतो – शत्रुघ्न सिन्हा
आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी तु्म्ही पदाचा राजीनामा द्या, अशी विनंती मी गजेंद्र चौहान यांना केली होती
Written by लोकसत्ता टीम

First published on: 22-01-2016 at 13:53 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Was willing to accept post of ftii interim chairman sinha