यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. त्यानंतर पाऊस लांबल्याने धरणांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. खडकवासला धरण साखळीतील पानशेत आणि वरसगाव या महत्त्वाच्या धरणांमध्ये अद्यापही १०० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे शहरात सुरू असलेली पाणीकपात टळण्याची शक्यता आहे.
जलसंपदा विभागाकडून दरवर्षी १५ ऑक्टोबपर्यंत धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचे पुढील वर्षभरासाठी नियोजन करण्यात येते. त्यानुसार टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमध्ये १५ ऑक्टोबपर्यंत २८.१५ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९६.५६ टक्के एवढा पाणीसाठा होता. त्यानंतर आतापर्यंत या चार धरणांमध्ये पाऊस सुरूच आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. वरसगाव आणि पानशेत ही दोन्ही धरणे १०० टक्के भरली आहेत. तर, टेमघर आणि खडकवासला धरणांमध्ये या अतिरिक्त पावसामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे. टेमघर धरण ३.०१ टीएमसी (८१.२८ टक्के) आणि खडकवासला धरण १.८६ टीएमसी (९४.०८ टक्के) एवढी भरली आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये ३.५९ टीएमसी पाणीसाठा जास्त आहे.
१५ ऑक्टोबपर्यंत धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठय़ानुसार जलसंपदा विभागाकडून पाण्याचे नियोजन केले जाते. मात्र, त्यानंतरही पाऊस पडल्याने हे पाणी पुणेकरांना वापरता येणार आहे. परिणामी शहरात सुरू असलेली पाणीकपात रद्द करण्याची मागणी पुणेकरांकडून करण्यात येत आहे.
टेमघर धरण डिसेंबर महिन्यात उर्वरित दुरुस्तीसाठी रिकामे करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात वरसगाव आणि पानशेत धरणांमधून शहराला पाणीपुरवठा न करता टेमघर धरणातून करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी या चार धरणांमध्ये १५ ऑक्टोबरला २५.३८ टीएमसी म्हणजेच ८७.०६ टक्के एवढे पाणी होते. सध्या चारही धरणांमध्ये २८.३४ टीएमसी म्हणजेच ९७.२२ टक्के एवढे पाणी आहे. परिणामी जलसंपदा विभागाने योग्य नियोजन केल्यास पुणेकरांना पुढील वर्षी उन्हाळा संपेपर्यंत पाणी कमी पडणार नाही.
पाणलोट क्षेत्रातील पाऊस
यंदा खडकवासला धरण साखळी प्रकल्पात परतीचा पाऊस भरपूर झाला आहे. १५ ऑक्टोबपर्यंत धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठय़ाचे जलसंपदा विभागाकडून पुढील वर्षभराचे नियोजन केले जाते. १५ ऑक्टोबरनंतर टेमघर धरणात १३७ मिलिमीटर, वरसगाव धरणात २३ मि.मी., पानशेत धरणात १३१ मि.मी. आणि खडकवासला धरणात १४८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.
धरणांमधील पाणीसाठा टीएमसीमध्ये
टेमघर ३.०१ (८१.२८ टक्के), वरसगाव १२.८२ (१०० टक्के), पानशेत १०.६५ (१०० टक्के) आणि खडकवासला १.८६ (९४.०८ टक्के)