पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबर पाण्याची मागणीही वाढल्याने नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. मुळशी आणि ठाेकरवाडी धरणातील पाणी आरक्षित करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. मुळशी धरणातून ७६० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी आरक्षित करण्यास राज्य शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच पाणी आरक्षित हाेईल, अशी माहिती मावळते आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण करू शकलाे नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. श्रीमंत महापालिकेचा काळ गेला असेही ते म्हणाले.
आयुक्त शेखर सिंह यांची नाशिक कुंभमेळा आयुक्तपदी बदली झाली. त्यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शहराची लाेकसंख्या ३० लाखांपर्यंत पोहोचली आहे. मुळशी धरणात ७६० दशलक्ष लीटर पाणी आरक्षित करण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली होती. लवकरच पाणी काेटा मंजूर हाेईल. आंद्रा धरणातून पाणी उचलण्यात येत आहे. भामा आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठी जलवाहिनीच्या कामाला वेग दिला आहे. २०२६ मध्ये काम पूर्ण हाेईल.
पवना बंदिस्त जलवाहिनीच्या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्याचबराेबर ठाेकरवाडी धरणातूनही ८०० दशलक्ष लीटर पाणी आणण्याचे प्रस्तावित आहे. तळवडेत होत असलेला जैवविविधता प्रकल्प शहराची ओळख हाेईल. पादचाऱ्यांचा विचार करूनच हरित सेतू प्रकल्प राबविण्यात येत असून असे प्रकल्प काळाची गरज आहे. कुदळवाडीतील अतिक्रमण कारवाई याेग्य हाेती. शहरात विकासाला माेठी संधी आहे. शहर विस्तारत असल्याने भविष्यात वाहतूक काेंडीचा प्रश्न गंभीर हाेईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
श्रीमंत महापालिकेचा काळ गेला
एके काळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असल्याचा लाैकिक हाेता. परंतु, आता ताे काळ राहिला नाही. शहर विस्तारत असताना प्रकल्प माेठ्या किमतीचे हाती घ्यावे लागत आहे. एक प्रकल्प शंभर ते दीडशे काेटीपर्यंत जात आहेत. त्यासाठी कर्जराेखे उभारावे लागत आहे. सर्वत्र कर्जराेख्ये उभारूनच मोठे प्रकल्प पूर्ण केले जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
वाकड ‘टीडीआर’मध्ये भ्रष्टाचार नाही
वाकड येथील आरक्षित भूखंडाचा विकास करण्यासाठी मंजूर एकत्रिकृत व विकास नियंत्रण व प्राेत्साहन नियमावली (यूडीसीपीआर) नुसार खासगी विकासकाला हस्तांतरित विकास हक्क (ॲम्युनिटी टीडीआर) दिला आहे. त्यात चुकीचे काही नाही. काेणताही भ्रष्टाचार झाला नाही. परंतु, घाेटाळ्याचे झालेले आराेप मनाला वेदना देऊन गेल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.
‘डीपी’त २५ वर्षांचा विचार
शहराचा २५ वर्षांचा विचार करून विकास आराखडा तयार करण्यात आला. त्यावर आलेल्या ५० हजार हरकतींमध्ये एकाच प्रकारच्या अनेक हरकती आहेत. हरकतींची विभागाणी पूर्ण झाली आहे. त्यावर लवकरच सुनावणी सुरू हाेणे अपेक्षित आहे. आराखडा रद्द करणे याेग्य होणार नसल्याचेही ते म्हणाले. नगरसेवक नसल्याने चांगल्या-वाईट कामांची सर्व जबाबदारी माझी हाेती. त्यामुळे माझ्यावर आराेप-प्रत्याराेप हाेणे साहजिकच हाेते. तीन वर्षातील कामाबाबत समाधानी आहे, असे शेखर सिंह म्हणाले.