पुणे : सिंहगड रस्ता परिसरात गुइलेन बॅरे सिंड्रोमचा उद्रेक झाल्यानंतर महापालिकेने पाणी तपासणी मोहीम हाती घेतली. या परिसरातील पाण्याचे नमुने सातत्याने तपासण्यात येत आहेत. आतापर्यंत ७ हजार १९५ नमुने तपासण्यात आले असून, त्यातील १३८ पाणी नमुने पिण्यास अयोग्य आढळले आहेत. या प्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने धोक्याचा इशारा दिला असू पाणीपुरवठा विभागाला दूषित नमुने आढळलेल्या भागात शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची सूचना केली आहे.

शहरात जीबीएस अथवा अतिसाराचा रुग्ण आढळून आल्यास त्याचा पिण्याच्या पाण्याचा स्रोत शोधण्यात येत आहे. हा स्रोत शोधून त्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. हे नमुने महापालिकेचे पर्वती जलशुद्धीकरण केंद्र आणि राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. आतापर्यंत ७ हजार १९५ पाणी नमुने तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. त्यांतील १३८ नमुने पिण्यास अयोग्य आढळले आहेत. यात खडकवासला धरण, खासगी विहिरी आणि खासगी रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) प्रकल्पांसह टँकरच्या पाण्याचा समावेश आहे.

एखाद्या भागातील पाणी दूषित असल्याचे तपासणीत समोर आल्यानंतर त्या भागात शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची सूचना आरोग्य विभागाकडून पाणीपुरवठा विभागाला केली जात आहे. या दूषित पाण्यात ई-कोलाय आणि कॉलिफॉर्म हे जीवाणू आढळून येत आहेत. त्यामुळे जलजन्य आजारांचा उद्रेक होण्याचा धोका आहे. त्यामुळे या भागात शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे गरजचे आहे, असे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जीबीएसची रुग्णसंख्या २२४ वर

राज्यात जीबीएसचे आतापर्यंत २२४ रुग्ण आढळून आले असून, त्यातील १९५ रुग्णांचे जीबीएस निदान झाले आहे. जीबीएसचे आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले असून, त्यात पुणे महापालिका ४६, महापालिकेत नव्याने समाविष्ट गावे ९५, पिंपरी-चिंचवड महापालिका ३३, पुणे ग्रामीण ३६ अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात इतर जिल्ह्यांत आतापर्यंत १४ रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी २६ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याचबरोबर १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यभरात १७८ रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. जीबीएसमुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.