पुणे : पुणे जिल्ह्यातील ३९३ पाणी नमुने मे आणि जूनमध्ये पिण्यास अयोग्य आढळल्याचे सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालातून समोर आले आहे. यात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी नमुन्यांसह पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी तपासणी केलेल्या पाणी नमुन्यांचा समावेश आहे.

राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे पाणी तपासणीसाठी नमुने पाठविण्यात येतात. याचबरोबर महापालिका त्यांच्या प्रयोगशाळेतील पाणी नमुन्यांच्या तपासणीचे अहवाल राज्य प्रयोगशाळेला पाठवितात. या आधारे राज्य प्रयोगशाळेकडून राज्यातील मासिक पाणी तपासणी अहवाल जाहीर केला होता. राज्य प्रयोगशाळेच्या मे महिन्यातील अहवालानुसार, पुण्यात एकूण २२ हजार ८२१ पाणी नमुन्यांची तपासणी झाली. त्यातील १९२ म्हणजेच ०.८ टक्के नमुने दूषित आढळले. ग्रामीण भागातील २ हजार ८१२ पाणी नमुन्यांपैकी १०३ दूषित आढळले असून, हे प्रमाण ३.६६ टक्के आहे. शहरी भागात २० हजार ९ पाणी नमुन्यांपैकी ८९ दूषित आढळले असून, त्यांचे प्रमाण ०.४४ टक्के आहे.

जून महिन्यात पुण्यात एकूण २२ हजार ४३३ पाणी नमुन्यांची तपासणी झाली. त्यातील २६१ म्हणजेच १ टक्का पाणी नमुने दूषित आढळले. ग्रामीण भागातील ३ हजार ४८ नमुन्यांपैकी १४९ दूषित आढळले असून, हे प्रमाण ४.८९ टक्के आहे. शहरी भागात १९ हजार ३८५ पाणी नमुन्यांपैकी ११२ दूषित आढळले असून, त्यांचे प्रमाण ०.५८ टक्के आहे. मेच्या तुलनेत जूनमध्ये पाणी नमुन्यांची संख्या कमी झाली असली, तरी दूषित पाणी नमुन्यांचे प्रमाण वाढले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जलजन्य आजारांमध्ये वाढ

पुण्यात यंदा मे आणि जून महिन्यांत जलजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात मे महिन्यात तीव्र अतिसाराचे ९११, आमांश १२, हिपॅटायटिस ७ आणि विषमज्वर १६ रुग्ण आढळून आले आहेत. जलजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत जून महिन्यात मोठी वाढ झाली आहे. जूनमध्ये तीव्र अतिसाराचे १ हजार २२६, हिपॅटायटिस १२ आणि विषमज्वर १७ असे रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.