पाणी मीटर हवंय, तर पैसे द्या

पाणी मीटर बसविण्यासाठी आणि जलवाहिन्या टाकण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून एल अ‍ॅण्ड टी या कंपनीला काम देण्यात आली आहेत.

प्रातिनिधीक छायाचित्र

खासगी ठेकेदारांकडून नागरिकांकडे पैशांची मागणी

पुणे : महत्त्वाकांक्षी समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत घरोघरी पाणी मीटरची जोडणी आणि मुख्य जलवाहिनीपासून वाहिनी टाकण्याची कामे करण्यासाठी महापालिकेने नियुक्त केलेल्या खासगी ठेकेदारांकडून नागरिकांकडे पैशांची मागणी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तशा तक्रारीही महापालिका प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत. त्यामुळे या कामात गैरप्रकार होत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

शहराची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेने सर्व भागाला समन्यायी पद्धतीने पाणी मिळावे यासाठी समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. याअंतर्गत नव्याने जलवाहिनी टाकणे, घरोघरी पाणी मीटर बसविणे, साठवणूक टाक्यांची उभारणी करणे अशी कामे महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहेत. याअंतर्गत पाणी मीटर जोडणीचे आणि घरापासून मुख्य जलवाहिनीपर्यंत  काही व्यासाच्या वाहिन्या टाकण्यासाठी पैशांची मागणी होत आहे. सिंहगड रस्ता परिसरातील हिंगणे खुर्द आणि सनसिटी भागात हा प्रकार पुढे आला आहे. दरम्यान, महापालिकेने नियुक्त केलेल्या एल अ‍ॅण्ड टी कंपनीच्या उपठेकेदारांकडून असे प्रकार होत आहेत. तशा काही तक्रारी आल्याची स्पष्ट कबुली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

हिंगणे खुर्द आणि सनसिटी परिसरात एकूण तीन साठवणूक टाक्यांचे काम सुरू आहे. या कामांचा स्थानिक नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी आढावा घेतला. तेंव्हा नागरिकांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या.

पाणी मीटर बसविण्यासाठी आणि जलवाहिन्या टाकण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून एल अ‍ॅण्ड टी या कंपनीला काम देण्यात आली आहेत. त्यानुसार शहराच्या विविध भागात कंपनीकडून कामेही सुरू करण्यात आली आहेत. नळ जोडणी आणि जलवाहिन्यांचा खर्च नागरिकांकडून महापालिकेकडे नळ जोडणी घेतानाच देण्यात आले आहे. मात्र,त्यानंतरही हा खर्च नागरिकांकडूनच वसूल केला जात आहे.

दरम्यान, खासगी ठेकेदारांकडून नागरिकांकडे पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्याच्या कार्यकारी अभियंता नंदकिशोर जगताप यांनी सांगितले. ते म्हणाले, की पाणी मीटर बसविण्याचे काम एल अ‍ॅण्ड टी कंपनीकडे आहे. मात्र या कंपनीकडून असे प्रकार झालेले नाहीत. कंपनीने नियुक्त केलेल्या उपकंपनीच्या ठेकेदारांकडून पैशांची मागणी होत असावी. नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेण्यात येऊ नये, अशी स्पष्ट सूचना कंपनीला देण्यात आली आहे.

दरम्यान, नागरिकांकडून पैसे आकारणी करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी आणि ज्या नागरिकांकडून ही रक्कम घेण्यात आली आहे ती त्यांना परत द्यावी, अशी मागणी नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी केली आहे.

नागरिकांना आवाहन

पाणी मीटर जोडणी आणि अन्य कामांसाठी पैशांची मागणी होत असेल तर पैसे देऊ नयेत, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. हा खर्च नागरिकांनी देणे अपेक्षित नाही. ठेकेदार कंपनीलाही तशी सूचना देण्यात आली आहे. ठेकेदाराकडून पैशांची मागणी होत असल्यास त्याबाबत पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

विविध कामांचे नियोजन

समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत १ हजार ६०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या नव्याने टाकणे, जुन्या-जीर्ण जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे करणे, घरोघरी पाणी मीटर बसविणे आणि ८२ साठवणूक टाक्यांची कामे करणे अशा तीन टप्प्यात कामे करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात निवासी आणि व्यावसायिक मिळकती मिळून तीन लाख पाणी मीटर बसविण्याचे प्रस्तावित आहे. ही प्रक्रियाही सुरू झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Water meter pay money akp

ताज्या बातम्या