पर्वती ते लष्कर जलकेंद्र या दरम्यान २२०० मिलीमीटर व्यासाची पोलादी जलवाहिनी टाकण्यासाठीची ११० कोटी रुपयांची निविदा स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी एकमताने मंजूर करण्यात आली. स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. पर्वती जलकेंद्रातून लष्कर जलकेंद्रात कालव्यावाटे पाणी नेले जाते. कालव्यातून पाणी नेताना होणार अपव्यय तसेच गळती यावर प्रतिबंध म्हणून २२०० मिलीमीटर व्यासाची पोलादी जलवाहिनी टाकण्याचे काम प्रस्तावित करण्यात आले होते. त्यासाठी आलेल्या निविदांमधून मे. कोया अ‍ॅन्ड कंपनी कन्स्ट्रक्शन यांची ११० कोटींची निविदा मंजुरीसाठी ठेवण्यात आली होती. ती समितीने मंगळवारी मंजूर केली. या कामासाठी चालू अंदाजपत्रकात ४० कोटी रुपयांची तरतूद आहे. जलवाहिनी टाकणे, चाचणी घेणे व ती कार्यान्वित करणे या कामांचा निविदेत समावेश आहे.
नव्या जलवाहिनीची ही निविदा मंजुरीसाठी आल्यानंतर स्थायी समितीमध्ये काँग्रेसचे अविनाश बागवे यांनी अनेक आक्षेप घेतले आणि संबंधित निविदेतील काही त्रुटी दाखवून दिल्या. त्याबाबत प्रशासनाकडून समाधानकारक खुलासा होऊ शकला नाही. खुलासा न झाल्यामुळे हा विषय अर्धा तास थांबवण्यात आला. त्यानंतरही आक्षेपांबाबत योग्यप्रकारे माहिती दिली गेली नाही. स्थायी समितीच्या बैठकीत या निविदेला मंजुरी देण्यात आली. मात्र अशाप्रकारे निविदा मंजुरीसाठी आणताना त्याबाबतची योग्य ती माहिती प्रशासनाने दिली पाहिजे, अशी सूचना अध्यक्षा अश्विनी कदम यांनी या वेळी केली.