पुणे : खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाला असला, तरी धरणातील पाण्याचा आढावा आणि पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पाणीकपातीचा निर्णय घेतला जाणार आहे. तूर्त आठवड्यातील दर गुरुवारची पाणीकपात पुढील काही दिवस कायम ठेवली जाणार आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील घटत्या पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात आठवड्यातील दर गुरूवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जून महिन्यात पाऊस लांबल्याने धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे पाणीकपातीमध्ये वाढ होऊन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या निर्णयाची हालचाल महापालिकेच्या स्तरावर सुरू झाली होती. मात्र गेल्या पाच दिवसांपासून शहरासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर नसला, तरी तो कायम असल्याने पाणीसाठ्यातही वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

या पार्श्वभूमीवर वाढीव पाणीकपातीचा निर्णय होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र पाणीसाठा वाढत असल्याने तूर्त वाढीव पाणीकपात होणार नाही. सद्य:स्थितीतील पाणीकपात म्हणजे आठवड्यातील दर गुरुवारी पाणी बंद ठेवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

खडकवासला धरण साखळी प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा सुरू झाल्यानंतर सध्याची पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तूर्त येत्या काही दिवसांत धरणातील पाणीसाठ्याचा आढावा आणि हवामान खात्याचा पावसाचा अंदाज घेतला जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.