शहरातील विविध भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जी टँकर भरणा केंद्र महापालिकेने सुरू केली आहेत, त्या केंद्रांमध्येच काळाबाजार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे तेथील गैरप्रकार उघडकीस येऊ नयेत म्हणून या केंद्रांमधील पाणी मोजणारे मीटर फोडण्यात आले आहेत, तर काही केंद्रांमध्ये मीटरच बसवण्यात आलेली नाहीत.
शहरात पर्वती जलकेंद्र, बंड गार्डन, पटवर्धन बाग, पद्मावती, वडगावशेरी, रामटेकडी आणि चतु:शृंगी अशा सात ठिकाणी महापालिकेची टँकर भरणा केंद्र आहेत. या केंद्रांमध्येच गैरप्रकार आणि काळाबाजार चालतो, ही बाब ‘सजग नागरिक मंच’तर्फे यापूर्वीही उघड करण्यात आली होती. तसेच तेथील गैरप्रकारांची ध्वनिचित्रफीतही महापालिका आयुक्तांना देण्यात आली होती. मात्र, या गैरप्रकारांची दखल अद्यापही घेण्यात आलेली नाही. टँकर भरणा केंद्रांमधील गैरप्रकारांची माहिती संघटनेचे अध्यक्ष विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्रबुद्धे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. गेली दोन वर्षे सातत्याने केलेल्या तक्रारींच्या प्रतीही त्यांनी सोमवारी आयुक्तांना दिल्या.
रामटेकडी येथे सात ठिकाणी टँकर भरण्याची व्यवस्था असून या सात ठिकाणी टँकरमध्ये किती पाणी भरले जात आहे, याची नोंद तीन मीटरद्वारे ठेवली जाते. त्यातील दोन ठिकाणांवर नियंत्रण ठेवणारा मीटर बंद असून तो फोडल्याचे दिसून आले. ही मीटर बंद असूनही संबंधित दोन्ही ठिकाणांवरून टँकर भरणा मात्र सकाळी सातपासूनच सुरू असल्याचे दिसले, असे वेलणकर यांनी सांगितले. पद्मावती येथील तीनपैकी एक मीटर अनेक दिवस बंद आहे. तरीही बंद असलेल्या मीटर पॉइंटवरून टँकरभरणा मात्र सुरू आहे. चतु:शृंगी येथे चार टँकर पॉइंट असून त्यातील दोन पॉइंटना मीटरच बसवण्यात आलेला नाही. जेथे मीटर नाही तेथूनही सायंकाळी उशिरापर्यंत टँकरभरणा सुरू असतो, असेही ते म्हणाले.
टँकर भरणा केंद्रांमध्येच टँकरचा काळाबाजार सुरू असून तो उघडकीस येऊ नये म्हणून मीटर बंद पाडणे, मीटर न बसवणे असे प्रकार सुरू आहेत. यापूर्वीही या केंद्रांमधील गैरप्रकारांबाबत लेखी तक्रारी देऊनही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळेच केंद्रांमध्ये गैरप्रकार सुरू आहेत. महापालिकेला फक्त सात टँकर भरणा केंद्रांवरही नियंत्रण ठेवता येत नाही, हेच यावरून दिसत आहे, असे संघटनेने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या सर्व ठिकाणांची तातडीने तपासणी करावी तसेच तेथे गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली असून या सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा बसवावी; तसेच या केंद्रांवरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.