०.११८८ दशलक्ष घन मीटर पाणीकोटा राज्य सरकारकडून मंजूर

पुणे : खडकवासला धरण साखळीतून वरसगाव येथे असलेल्या सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) दरवर्षी ०.११८८ दशलक्ष घन मीटर पाणीकोटा राज्य सरकारने मंजूर केला आहे. त्यानुसार आता या धरण साखळीतून बीएसएफच्या जवानांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जाणार आहे. खडकवासला धरण साखळीमधील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठय़ाची क्षमता २९ अब्ज घनफूट (टीएमसी) आहे. या धरण साखळीतून पुणे शहराबरोबरच, दौंड नगरपालिका, २२ ग्रामपंचायती आणि विविध १८ संस्थांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. तसेच हवेली, दौंड, बारामती, इंदापूर तालुक्यांतील ५१ हजार हेक्टर क्षेत्रावरील सिंचनासाठीही पाणी देण्यात येते. याबरोबरच खडकवासला धरण साखळीतून १८ विविध संस्थांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये नऱ्हे येथील काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय, मुंढवा येथील कल्याणी स्पेशल स्टील, सिपोरेक्स इंडिया कंपनी आणि भारत फोर्ज कंपनी, खडकीतील गॅरिसन इंजिनिअर, हडपसरमधील साइझा स्टड फार्म आणि अमानोरा पार्क टाउनशिप, धायरीतील पुणे अंधशाळा, रेसकोर्स येथील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब, सीडब्ल्यूपीआरएस, सीरम इन्स्टिटय़ूट, पूनावाला स्टड अ‍ॅण्ड इंजिनियिरग प्रायव्हेट लिमिटेड, मांजरी स्टड फार्म, जिल्हा मत्स्यबीज व्यवसाय विभाग, वडगाव बुद्रुक येथील सिंहगड टेक्निकल इन्स्टिटय़ूट, आंबेगाव खुर्द येथील बीएपीएस स्वामीनारायण संस्था आदींचा समावेश आहे. आता बीएसएफलाही खडकवासला धरण साखळीतून पाणी मिळणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी ‘बीएसएफ’ला पाणीकोटा मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव ३ नोव्हेंबर २०२१ रोजी राज्य सरकारकडे पाठवला होता. सन २०३० पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन ०.११८८ दशलक्ष घन मीटर पाणीकोटा मंजूर करण्यात आला असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.