पुणे : ‘दुरून डोंगर साजरे’ या म्हणीनुसार आपल्या सर्वांना परदेशाविषयी, तेथील माणसांविषयी आणि पर्यटन स्थळांविषयी कुतूहल असते,’ असे मत प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी मंगळवारी व्यक्त केले.
पद्मयानी प्रकाशनच्या वतीने शरद पाठक यांच्या ‘चुकवू नये असे काही…’ आणि ‘आम्ही सिडनीकर’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन सुधीर गाडगीळ आणि लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले.
त्याप्रसंगी गाडगीळ बोलत होते. उद्योजक विश्व चोरडिया आणि प्रकाशक विष्णू मांजरे या वेळी उपस्थित होते. गाडगीळ म्हणाले, ‘संघर्ष, कष्ट आणि अडचणींवर मात करून यशस्वी झालेल्या शरद पाठक यांनी जीवनामध्ये यशस्वी झालेल्या मित्र-मैत्रिणींची ओळख या लेखनातून करून दिली आहे. त्याचप्रमाणे जगभरातील पर्यटनस्थळांचे दर्शन त्यांच्या लेखनातून घडते.’
गोडबोले म्हणाले, ‘आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या ‘केल्याने देशाटन’ या सुत्रानुसार जितकी भ्रमंती करू तितके विविधांगी अनुभव आपल्याला मिळतात. पर्यटनाने माणूस खऱ्या अर्थाने समृद्ध होतो. पाठक यांच्या पुस्तकांमध्ये पर्यटनस्थळांविषयी सचित्र तसेच एकाच वेळी मराठी आणि इंग्रजीमध्ये माहिती देणारी मांडणी वाचकांना मार्गदर्शक ठरणारी आहे.’ प्रतिभा इनामदार यांनी सूत्रसंचालन केले.