मशिदीवरील भोंगे हटविण्यावरुन सुरू असलेल्या राजकारणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय समितीचे वरिष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना परखड भाष्य केले. धर्मावरून सुरू असलेले राजकारण चुकीचे असून प्रत्येकाने एकमेकांच्या धर्माचा आदर केला पाहिजे. धार्मिक स्वातंत्र्य अबाधित ठेवून धार्मिक अभिव्यक्तीसाठी देशभरात एक नियमावली करायला हवी, असे त्यांनी नमूद केले.

धर्माच्या नावावर राजकारण केले जात असून प्रक्षोभक विधानांमुळे तेढ निर्माण केली जात आहे. राजकीय हेतूने अशा प्रकारची विधाने केली जातात. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले जाते. देशातंर्गत तसेच बाह्य शक्ती तेढ निर्माण करत आहेत. अशा प्रकारच्या विधानांमुळे देशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचे काम केले जात आहे. प्रत्येकाला आपले रितीरिवाज जपण्याचे अधिकार आहेत. एकमेकांच्या धर्माचा आदर करायला हवा. धार्मिक अस्मिता जरुर जपाव्यात. मात्र, जाणीवपूर्वक प्रक्षोभक विधाने करून तेढ निर्माण करणे चुकीचे आहे. धार्मिक रितीरिवाज, परंपरा, अभिव्यक्तींसाठी देशपातळीवर नियमावली करायला हवी. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकारांना आळा बसेल आणि सामाजिक ऐक्यही अबाधित राहील, असे इंद्रेश कुमार यांनी सांगितले. मुस्लीम राष्ट्रीय मंचचे इरफान अली, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अली दारुवाला, अबु बक्र नकवी आदी यावेळी उपस्थित होते.

सामाजिक ऐक्य जपण्यासाठी प्रत्येकाने एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करायला हवेत. प्रत्येकाने घटनेच्या अधीन राहून नियमांचे पालन करावे. त्यामुळे सामाजिक स्वास्थही जपले जाईल, असे त्यांनी सांगितले.

गुन्हेगारांना धर्म नसतो
उत्तरप्रदेशात विशिष्ट धर्माच्या आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवून घर जमीनदोस्त केल्याचा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. त्या वेळी इंद्रेश कुमार म्हणाले, ‘गुन्हेगारांना धर्म नसतो. धर्माच्या नावाखाली केले जाणारे राजकारण बंद करायला हवे. मतांसाठी समुदायांचे तुष्टीकरणाचे कामही थांबविले पाहिजे. आपल्या देशातील विविधता हे बलस्थान आहे. विविधेतील एकता जपून प्रत्येकाने धर्माचा आदर करायला हवा.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिक्षण संस्थेत राजकारण नकोच
शिक्षण संस्थेत आंदोलनाचे प्रकार, राजकारण चुकीचे आहे. शिक्षित आणि संस्कारी असणे, या भिन्न गोष्टी आहेत. शिक्षण संस्थांतील विद्यार्थी शिक्षित असायला हवेत. त्या बरोबरच ते संस्कारी असणे गरजेचे आहे. संस्कारी विद्यार्थी देशाला दिशा देण्याचे काम करतात. अखंड भारत संकल्पना समाजावून घ्यायला हवी. ज्याप्रमाणे युरोप खंडातील सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन ध्येयधोरणे ठरविली. त्याप्रमाणे भारतीय उपखंडातील सर्व राष्ट्रांनी एकत्र यायला हवे. एकमेकांचे अखंडत्व जपून काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे दोन राष्ट्रातील द्वेषही कमी होईल तसेच आर्थिक प्रगतीही साधता येईल, असे इंदेशकुमार यांनी नमूद केले.