मंगल कार्यालयांच्या तारखा आरक्षित; लग्न जमविणाऱ्या संस्थांचे कामही वेगात

पुणे, जेजुरी : करोनाच्या प्रादुर्भावातील संपूर्ण टाळेबंदी ते निर्बंधाच्या कालावधीत रखडलेल्या अनेक विवाह सोहळय़ांसाठी आता वाट मोकळी झाली आहे. प्रादुर्भावाचे प्रमाण कमी झाल्याने निर्बंधात देण्यात आलेली शिथिलता आणि त्याचवेळी विवाहासाठी मुहूर्ताचे दिवस आल्याने नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत विवाह सोहळय़ांची लगबग सध्या सुरू झाली आहे. पुण्यासह राज्यातील सर्व प्रमुख शहरे आणि ग्रामीण भागातही बहुतांश मंगल कार्यालयांच्या तारखा आरक्षित झाल्या आहेत. विवाह जमविणाऱ्या संस्थांचे कामही आता जोमात सुरू झाले आहे.

गेली दीड वर्षे राज्यात करोनाने हाहाकार माजवला होता. उद्योग व्यवसायांबरोबरच कौटुंबिक वातावरणही विस्कळीत झाले. टाळेबंदी, कडक निर्बंध आणि करोना संसर्गाची भीती यामुळे विवाह जमवणाऱ्या संस्थांच्या कार्यालयांनाही कुलपे लागली होती. अनेक घरांमध्ये विवाहाचे वय झालेल्या मुला-मुलींचे विवाह लांबले होते. निर्बंधांच्या काळात तुरळक पाहुण्यांच्या उपस्थितीत काहींनी विवाह सोहळे केले असले, तरी आता करोनाची भीती काही प्रमाणात कमी झाल्याने उपवर मुला-मुलींच्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे. विवाह धामधुमीत करण्यासाठीही अनेक जण थांबले होते.

सध्या मंगल कार्यालये,लॉन्स,पार्टी हॉल या ठिकाणी स्वच्छता, रंगरंगोटीची कामे सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.लग्नात लागणारे केटर्स ,मंडप व्यावसायिक, भटजी, बँड, सनई -चौघडा, सजावटकार यांचीही लगबग सुरू झाली आहे. विवाह मुहूर्ताच्या कालावधीत अनेकांच्या हाताला रोजगार मिळू शकणार आहे. विवाह झाल्यानंतर अनेक जोडपी दर्शनासाठी जेजुरीला खंडोबाच्या गडावर येत असतात. सध्याची स्थिती पाहता नोव्हेंबर ते फेब्रुवारीत अनेक विवाह होण्याची शक्यता असल्याने या कालावधीत जेजुरीतील अर्थकारणालाही गती मिळू शकणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये सध्या समाधानाचे वातारण आहे.

मुहूर्त केव्हापासून?

दिवाळीनंतर कार्तिक महिन्यात तुळशीविवाह झाल्यानंतर लग्नाची धामधूम सुरू  होणार आहे. शहरी, ग्रामीण भागातील मंगल कार्यालयाच्या बुकिंग तारखा संपत आल्या आहेत. पितृपक्ष संपून आश्विन सुरू झाल्यापासूनच उपवर मुला-मुलींसाठी आयुष्याचा जोडीदार बघण्यास वधू-वर पक्षांकडील कुटुंबीयांची धावपळ सुरू झाली आहे.

नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत विवाहाचे अनेक मुहूर्त आहेत .त्यामुळे पुण्यातील बहुतांश मंगल कार्यालयातील तारखा आरक्षित होत आल्या आहेत. वीस महिने विवाह सोहळे न झाल्याने मंगल कार्यालये ओस पडली होती. आता विवाहासाठी एकदम मागणी वाढल्याने मंगल कार्यालयांची कमतरता भासत आहे. – मुकुंद यत्नाळकर, संचालक, विष्णुवर्धन केटर्स प्रा. लि. पुणे)