पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाने आपत्कालीन विभागात अत्याधुनिक ट्रायेज व पुनर्जीवन सुविधा उपलब्ध केली आहे. तालेरा रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसीस केंद्र सुरु करण्यात आले आहे. यामुळे वैद्यकीय सेवांना बळकटी मिळेल, असा विश्वास आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केला.

दाना टीएमफोर इंडिया कंपनीने सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) उपक्रमांतर्गत या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दाना टीएम फोर इंडियाचे प्रकल्प प्रमुख शिवाजी निळकंठ, प्रशासन विभागाच्या प्रमुख योगिता सुषीर यांच्यासह डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ट्रायेज सुविधेमुळे रुग्णांच्या प्रकृतीच्या स्थितीनुसार जलद मूल्यमापन आणि प्राधान्यक्रम ठरविणे शक्य होईल. पुनर्जीवन सुविधेमुळे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यास मदत होईल. गंभीर रुग्णांना जलद, प्रणालीबद्ध आणि उच्च गुणवत्तेची सेवा देण्यासाठी या सुविधा उपयुक्त ठरणार आहेत. ट्रायेज व पुनर्जीवन या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे तातडीच्या वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांची सेवा करण्याच्या रुग्णालयाच्या क्षमतेत वाढ होईल, असा विश्वास वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी व्यक्त केला.

तालेरा रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसीस केंद्र

महापालिकेच्या तालेरा रुग्णालयात नवीन डायलिसीस केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रासाठी फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सामाजिक दायित्व निधीतून आठ डायलिसीस मशिन अत्याधुनिक खाटांसह दिल्या आहेत. डायलिसीस केंद्रामुळे मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळेल. त्यांना जवळच मिळणाऱ्या या सुविधेमुळे धावपळ कमी होण्यास मदत होईल, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

रुग्णांनाव मिळणाऱ्या सुविधा

अत्याधुनिक डायलिसीस मशीन, प्रशिक्षित डॉक्टर व तज्ज्ञ तंत्रज्ञांची उपलब्धता. प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र व स्वच्छ खाटांची सोय, आपत्कालीन उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा, निर्जंतुकीकरण आणि स्वच्छतेची काटेकोर काळजी, रुग्णांच्या सोयीसाठी आरामदायी, हवेशीर व सुरक्षित वातावरण, वेळोवेळी आरोग्य तपासणी व मार्गदर्शनाची सोय आणि उद्वाहक (लिफ्ट)ची व्यवस्था असणार आहे.

महापालिका गेल्या काही वर्षांत आरोग्य सेवेत सातत्याने सुधारणा करत आहे. तालेरा, जिजामाता व आकुर्डी रुग्णालयात नव्या डायलिसीस केंद्रांची भर पडल्याने आरोग्य सेवांच्या उपलब्धतेत आणखी वाढ झाली. तालेरा रुग्णालयातील हे डायलिसीस केंद्र नागरिकांना दिलासा देणारे ठरणार असून महापालिकेच्या ‘सर्वांसाठी आरोग्य’ या संकल्पनेला बळकटी देणार आहे.विजयकुमार खोराटे,अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका