पुणे : ‘जीवनात मूर्तींचा उपयोग फार आहे. आपण पूजेतच रमून जातो. कार्य सिद्धीस जाण्यासाठी देवाची उपासना ज्या पद्धतीने करायची, त्या प्रकारची मूर्ती घडवली जाते. लोकांच्या धारणा, त्यांची मूल्ये त्या मूर्तींमध्ये उमटतात. गणेशमूर्तीही त्याला अपवाद नाहीत. त्यामुळेच दोन हातांच्या, दोन मस्तकांच्या गणेशापासून ते वीस हातांच्या गणेशमूर्ती घडलेल्या दिसतात,’ असे मत मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी शनिवारी व्यक्त केले.
इंडी हेरीटेज आणि बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने आयोजित ‘मास्टर क्लास’मध्ये डॉ. देगलूरकर यांनी वेगवेगळ्या भागातील विविध प्रकारच्या गणेश मूर्तींच्या वैशिष्ट्यांवर भाष्य केले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या विभाग प्रमुख डॉ. मंजिरी भालेराव, बेलवलकर सांस्कृतिक मंचचे समीर बेलवलकर, इंडी हेरीटेजचे समन्वयक तुषार जोशी या वेळी उपस्थित होते.
देगलूरकर म्हणाले,‘अगदी प्राचीन काळापासून गणेशाची पूजा केली जात असल्याचे फारसे संदर्भ आढळत नाहीत. मात्र, गणेश मूर्ती इसवी सन पाचव्या शतकांपासून घडवलेल्या दिसतात. प्रत्येक मूर्तीची काही वैशिष्ट्यांनुसार ओळख केली जाते. मात्र, शास्त्रामध्ये आधार असलेल्या वर्णंनाचा वापर करूनच त्या मूर्तीची वैशिष्ट्ये सांगितली जातात. मुद्गल पुराण आणि गणेश पुराण या दोन पुराणांमध्ये गणपती या देवतेची विस्तृत माहिती मिळते.’
‘अफगाणिस्तान येथील महागणपती, कंबोडिया येथील गणेशमूर्ती, जपानच्या कांगीतेन येथील गणेशाची मूर्ती, इंडोनेशियात ठिकठिकाणी आढळणाऱ्या दुर्मिळ गणेश मूर्ती या आग्नेय आशियामध्ये अनेक ठिकाणी अशा गणेशमूर्ती आढळतात. पाटण येथील सहा हातांचा आणि सहा तोंडाचा गणेश, वाराणसी येेथील सोंडेवर हत्तींची रांग असलेला यक्ष विनायक, मोरावर आरूढ पुण्यातील त्रिशुंड गणपती, औंढा नागनाथ येथील तांत्रिक प्रकारची दुर्मिळ गणेशमूर्ती, सिंहारूढ गणेशाच्या हेरंब रूपातील मूर्ती या प्रत्येक मूर्तीमध्ये तिथले स्थानिक सांस्कृतिक संदर्भ-प्रतिके दिसतात. शास्त्रांमध्ये असलेली वर्णने आणि लोकांच्या धारणांमधून त्यांचे वैशिष्ट्य उलगडता येते. मात्र, काही मूर्तींचे वैशिष्ट्य अद्यापही उलगडले नाहीत. घोसाई चतुष्पाद गणेश कोड्यात टाकणारी मूर्ती आहे,’ असे निरिक्षण देगलूरकर यांनी नोंदवले. अनुश्री घिसाड यांनी सूत्रसंचालन केले.
…अशी घडली ‘रामलल्ला’ची मूर्ती
‘अयोध्येत रामलल्लाचे भव्य मंदिर उभारण्यात येत होते. त्यावेळी रामाची मूर्ती कशी असावी, यावर चर्चा झाली. काहींनी रामाची मूर्ती भव्य-दिव्य असवी, असे सुचवले. मात्र, रामलल्लाच्या मंदिरात श्री रामचंद्रांच्या बालरूपाची मूर्तीच अपेक्षित होती. त्यामुळे ती मूर्ती लहान असावी, त्यावर किरीट नसावे, अशा सूचना केल्या. आपल्याकडे आराध्य देवतेच्या विविध रूपांना अनुसरून मूर्ती घडवली जाते. बऱ्याचदा श्रीकृष्णाचे बालस्वरूप सर्व देवतांच्या बालरूपातील मूर्तीमध्ये दिसते. त्यामुळे तो श्रीकृष्णाची नव्हे, तर ‘रामाची’च मूर्ती आहे, हे समजण्यासाठी मूर्तीच्या हातात धनुष्य दिले आहे.’ अशी आठवण देगलूरकर यांनी सांगितली.
मूर्ती लहान मोठी आहे, किंवा त्यापेक्षा ती चार हातांची, दोन हातांची आहे. त्याला शास्त्राच्या दृष्टीने फार महत्व नसते. मूर्तीचे वैशिष्ट्य लक्षात घ्यायला हवे. – गो. बं. देगलूरकर, मूर्तीशास्त्राचे अभ्यासक