पुणे : ‘सिंहगड रस्त्यावरील खडकवासला, किरकिटवाडी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण वाढण्यामागे दूषित पाणी हे केवळ एक कारण नाही, तर कोंबड्यांचे कच्चे मांस खाणे हे देखील एक कारण आहे,’ अशी माहिती समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीच याबाबत माहिती दिली आहे.

पुणे महापालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अजित पवार यांनी  महापालिकेला भेट देऊन आयुक्त, अधिकारी, कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘जीबीएस रुग्णांची संख्या दूषित पाण्यामुळे वाढत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, या भागातील नागरिकांनी कच्चे मांस खाल्ल्याने या आजाराची बाधा झाल्याचे कारणही समोर आले आहे.’

‘नागरिकांनी मांस खाताना ते शिजवून खावे. या भागातील कोंबड्या मारू किंवा जाळून टाकू नका. हा आजार अधिक वाढू नये, यासाठी नक्की काय केले पाहिजे, कोणत्या उपाययोजना करण्याची गरज आहे, याबाबत मार्गदर्शन करणारी माहिती नागरिकांना द्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्तांसह आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत’.

कोंबड्यांचे मांस खाल्याने हा आजार होत असला तरी कोंबड्यांना मारून टाकण्याची किंवा जाळून टाकणं असे करणे आवश्यक नाही. नागरिकांनी कच्चे मांस न खाता ते चांगल्या प्रकारचे शिजवून मगच खावे, असे स्पष्टीकरण पवार यांनी दिले.

या आजाराच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे चित्र असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे. पाणी देखील उकळून आणि गार करून प्यावे. हा आजार होऊ नये यासाठी नक्की काय केले पाहिजे, याबाबत जनजागृती करण्यासाठी आवश्यक त्या सूचना विभागीय आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.

Story img Loader