पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनकडून (महामेट्रो) वनाझ ते रामवाडी मेट्रो मार्गावरील छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक ते शनिवार पेठ यांना जोडणाऱ्या मुठा नदीवरील तानपुऱ्याच्या आकाराचा अत्याधुनिक ‘केबल स्टेड ब्रिज’ हा पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील शनिवार पेठ, सदाशिव पेठ आणि नारायण पेठेतून प्रवाशांना मेट्रो स्थानकापर्यंत जाणे सोपे झाले आहे.

या पादचारी पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, सुनील कांबळे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, संचालक अतुल गाडगीळ आणि विनोदकुमार अग्रवाल, अतिरिक्त महाव्यवस्थापक चंद्रशेखर तांबवेकर उपस्थित होते.

‘या पुलामुळे शहरातील शनिवार पेठ, सदाशिव पेठ आणि नारायण पेठ या भागांना मेट्रो स्थानकाशी थेट जोडण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना मेट्रो सेवा वापरणे अधिक सुलभ आणि सोयीचे होणार आहे. या पादचारी पुलामुळे मेट्रोच्या वापरात वाढ होईल. हा पूल पुणे मेट्रोच्या पायाभूत सुविधा विकासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जाईल,’ असे फडणवीस यांनी सांगितले.

पादचारी पुलाची वैशिष्ट्ये

– या पादचारी पुलाची रचना तानपुऱ्याच्या आकाराप्रमाणे

– मध्य वस्तीतील प्रवाशांना मेट्रो स्थानकावर जाणे सोपे

– पूल १७९.७९१ मीटर लांब आणि ८ मीटर रुंद असून, त्यामध्ये ७२.२६९ मीटर उंचीचा ७० डिग्री कललेला काँक्रिटचा ‘पायलन’चा वापर

– नदीवर बांधण्यात आलेला शहरातील पहिलाच ‘केबल स्टेड ब्रिज’ (cable stayed bridge)

– या पुलामुळे मेट्रो प्रवाशांना थेट स्थानकापर्यंत पोहोचणे शक्य

– जंगली महाराज रस्त्यापर्यंत चालत जाण्यासाठी मार्ग उपलब्ध