पुणे : शहराचा वाढत असलेला विस्तार आणि त्यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागावी, यासाठी पुढील वर्षभरासाठी २१.०३ दशलक्ष घनफूट (टीएमसी) पाणी शहराला द्यावे, अशी मागणी महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे केली आहे. शहराला चालू वर्षासाठी (२०२५-२६) लागणाऱ्या पाण्याचे अंदाजपत्रक महापालिकेने तयार केले असून त्यामध्ये ही मागणी करण्यात आली आहे. तसेच शहराची लोकसंख्या ८४ लाख झाली असल्याचे या अंदाजपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे हे अंदाजपत्रक मान्यतेसाठी ठेवले जाणार असून, आयुक्तांच्या मंजुरीनंतर पाटबंधारे विभागाकडे पाठविण्यात येणार आहे.

राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार महापालिका दरवर्षी पाटबंधारे विभागाला पाण्याचे अंदाजपत्रक सादर करते. त्यानुसार शहराची लोकसंख्या सुमारे ८४ लाख झाली असल्याचे स्पष्ट करून महापालिकेने चालू वर्षासाठी २१.०३ टीएमसी इतकी पाण्याची मागणी केली आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

खडकवासला धरणसाखळीसह भामा आसखेड, धरणातून पुणे शहराला पाणीपुरवठा केला जातो. शहराच्या लोकसंख्येनुसार हे पाणी दिले जाते. पाणीपुरवठ्यासंदर्भात महापालिका आणि पाटबंधारे विभाग यांच्यात झालेल्या करारानुसार, वर्षाला १२.४१ टीएमसी पाणी पुणे शहराला दिले जाते. शहराचा विस्तार चारही दिशांना होत असून लोकसंख्येतही वाढ होत आहे. शहरातील लोकसंख्या ८१ लाख आणि नोकरी, व्यवसायानिमित्त शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या सुमारे तीन लाख अशी सुमारे ८४ लाख झाली आहे. या नागरिकांना पुरेसे पाणी देण्यासाठी पाटबंधारे विभागाने २१.०३ टीएमसी पाणी द्यावे, अशी मागणी महापालिकेने तयार केलेल्या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.

दरम्यान, महापालिकेच्या हद्दीत नव्याने ३४ गावांचा समावेश करण्यात आल्याने राज्यातील सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेली महापालिका अशी ओळख पुण्याची झाली आहे. समाविष्ट गावातील नागरिक, स्थलांतरित झालेली लोकसंख्या याबरोबरच कामानिमित्त दररोज शहरात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

गळतीचे प्रमाण कमी

शहरातील सर्वच भागांतील नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी महापालिकेने मीटरने पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. समान पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून हे मीटर बसविले जात आहेत. या योजनेमुळे गळतीचे प्रमाण कमी होऊन ३२ टक्क्यांवर आले असल्याचे अंदाजपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

पाण्याच्या अंदाजपत्रकाची वैशिष्ट्ये

– पुणे शहराची लोकसंख्या : ८१ लाख

– शहरातील ये-जा होणारी लोकसंख्या : ३ लाख

– नियमित होणारा पाणीपुरवठा ११.३४ टीएमसी

– जलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा : १.२३ टीएमसी

– समाविष्ट गावांमधील पाणीपुरवठा : ०.९७ टीएमसी

– टँकरने केला जाणारा पुरवठा : ०.१९ टीएमसी

– व्यावसायिक आस्थापनांसाठीचा वापर : ०.३४ टीएमसी

– शहरात कामानिमित्त ये-जा करणाऱ्या लोकसंख्येसाठी पाणी : ०.१७ टीएमसी

– शहरात होणारी पाण्याची गळती : ६.७५ टीएमसी (३२ टक्के)

– महापालिकेची एकूण पाण्याची मागणी : २१.०३ टीएमसी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे शहराचा वाढता विस्तार आणि वाढणारी लोकसंख्या यामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी २१.०३ टीएमसी पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केले जात आहे. शहराची लोकसंख्या ८० लाखांपेक्षा पुढे गेल्याने या वाढीव पाणीकोट्याच्या मागणीचा प्रस्ताव आयुक्तांच्या मान्यतेनंतर पाटबंधारे विभागाकडे पाठविला जाणार आहे.- नंदकिशोर जगताप, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका