पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. पत्नीच्या प्रियकराने आणि पत्नीने नकुल भोईरची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

चिंचवड पोलिसांनी प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार वय वर्ष- २१ यास अटक केली आहे. पत्नी चैतालीने पती नकुल भोईरची हत्या केल्याचं याआधी समोर आलं होतं. चिंचवड पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर चैताली आणि प्रियकर सिद्धार्थने हत्या केल्याचे समोर आले आहे.

शुक्रवारी पत्नी चैतालीने पती नकुल भोईरची हत्या केल्याची बातमी शहरभर वाऱ्यासारखी पसरली. या घटनेनंतर चिंचवड परिसरात एकच खळबळ उडाली होती. आरोपी चैतालीला चिंचवड पोलिसांनी अटक केली होती. या घटनेनंतर नकुलबद्दल सोशल मीडियावर सहानुभूती व्यक्त करत संताप व्यक्त करण्यात आला होता.

चिंचवड पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला आणि अवघ्या पाच दिवसांमध्ये चैतालीने प्रियकराच्या मदतीने नकुलची हत्या केल्याचं उघड झालं. एकटी चैताली नकुलची हत्या काशी करू शकते? असा संशय चिंचवड पोलिसांना होता. यावरूनच चिंचवड पोलिसांनी चैतालीची सखोल चौकशी केली.

वेळप्रसंगी पोलिसी खाक्या दाखवला, त्यानंतर चैतालीने प्रियकर सिद्धार्थ सोबत प्लॅन करून पतीची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी सिद्धार्थला अटक केली आहे.