पुणे : ‘दहशतवाद्यांनी जशा आम्हाला गोळ्या घातल्या, तशा त्यांनाही घाला,’ या शब्दांत पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांची पत्नी प्रगती आणि कौस्तुभ गनबोटे यांची पत्नी संगीता यांनी आपल्या संतापजनक भावनांना वाट करून दिली.पहलगाम येथील मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे या बालपणीच्या मित्रांचा मृत्यू झाला. जगदाळे आणि गनबोटे कुटुंबीय सहलीसाठी काश्मीरला गेले होते. या दोघांचे पार्थिव आणि त्यांच्या कुटुंबीयांना गुरुवारी पुण्यात आणण्यात आले. त्यानंतर प्रगती आणि संगीता यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा हृदयद्रावक अनुभव कथन केला.

‘तिकडे कुणीच नव्हते. अधिकारी किंवा सुरक्षारक्षकही नव्हते. पतीच्या उपचारांत दिरंगाई झाली. ते जिवंत आहेत; जिवंत आहेत, असे सांगितले जात होते. पण, आम्हाला तपशिलात काहीच सांगितले गेले नाही. हल्ल्याचा प्रतिकार एका घोडेवाल्याने केला. त्याच्यावरही गोळ्या झाडण्यात आल्या. मी आयुष्यभरासाठी पोरकी झाले आहे. माझा नवरा माझ्याबरोबर नाहीये. या मुलांनी काय करायचे,’ असा हताश प्रश्न प्रगती यांनी विचारला. ‘मी माझ्या माणसाला आता बघू शकत नाही. त्यांनी आमच्या माणसांना जशा गोळ्या घातल्या, तशा त्यांना मारा आणि आम्हाला दाखवा,’ असा संताप प्रगती यांनी व्यक्त केला.

कौस्तुभ गनबोटे यांची पत्नी संगीता यांनीही अंगावर काटा आणणारा अनुभव सांगितला. ‘जगदाळे कुटुंबीय आणि आम्ही एकत्र होतो. तिकडे धर्मग्रंथावरून काही तरी झाले. चार हल्लेखोरांनी आम्हाला अजान वाचायला सांगितली. आम्ही टिकल्या काढून फेकून दिल्या. सर्व महिलांनी मोठ्या आवाजात अजान म्हटली. तिथे एक मुस्लिम घोडेवाला होता. या निष्पाप लोकांना का मारत आहात, अशी विचारणा त्याने हल्लेखोरांकडे केली. मात्र त्याचे कपडे काढून त्यालाही मारण्यात आले. हल्ल्यानंतर बऱ्याच लोकांनी मदत केली. सैन्य दलाचीही मदत झाली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता,’ अशी आपबीती संगीता यांनी सांगितली.

शरद पवारांसह अन्य राजकीय नेत्यांकडून सांत्वन

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुरुवारी जगदाळे आणि गनबोटे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. जगदाळे यांच्या कर्वेनगर येथील निवासस्थानी पवार यांच्याबरोबर अंकुश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, भाजपच्या राज्यसभेच्या खासदार प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णी यांनी सांत्वन केले. त्यानंतर अंत्यसंस्कारावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. दरम्यान, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही कुटुंबीयांची सायंकाळी भेट घेतली.

‘लहान मुलांसमोर गोळ्या झाडल्या’

‘लहान लहान मुलांसमोर त्यांच्या वडिलांना गोळ्या घालण्यात आल्या. आम्ही एकमेकींना काय सांगू हेच कळत नव्हते. आम्ही चिखलात पडलो होतो. मला उभेही राहता येत नव्हते. मी माझ्या माणसाला आता बघू शकत नाही,’ अशा शब्दांत पती संतोष जगदाळे यांना गमावल्याच्या दुःखाला प्रगती यांनी वाट करून दिली.