लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : महापालिकेत सात गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित असून, या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर हद्दवाढ होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराला मुळशी धरणातून अतिरिक्त पाणीसाठा देण्याची मागणी केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने वाढत असून, शहराला अतिरिक्त पाणीसाठ्याची गरज आहे. त्या दृष्टीने महापालिका विविध प्रयत्न करत आहे. मुळशी धरणातून पाणी आरक्षित करावे, असा प्रस्ताव देखील त्याच उद्देशाने महापालिकेने दिलेला आहे. मात्र, जलसंपदा विभागाने तुर्तास त्याला नकार दिलेला आहे. याबाबतचा निर्णय शासन घेणार असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा-पुण्याच्या तळेगावमधून घुसखोर तीन बांगलादेशींना बेड्या; आठ महिन्यांपासून करायचे ‘हे’ काम?

हिंजवडीसह गहुंजे, जांबे, मारुंजी, माण, नेरे, सांगवडे या सात गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत. या सातही गावांचा समावेश करताना पाणीपुरवठ्याचा देखील विचार करावा लागेल. गावांचा समावेश झाल्यास मुळशी धरणातून अतिरिक्त पाणी देखील महापालिकेला मिळावे, अशी विनंती सरकारकडे करणार असल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी विभागनिहाय बैठका

महापालिकेच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाचे कामकाज सुरू आहे. विविध कामे, तरतुदींबाबत विभागनिहाय अधिकारी यांच्या बैठका घेणार आहे. या अर्थसंकल्पात नागरिकांनी सुचविलेल्या कामांचाही समावेश केला जाणार आहे. या व्यतिरिक्त हवामान अर्थसंकल्पावरही भर दिला जात असल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले.