पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयातून कैद्याने पलायन केल्याप्रकरणी चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी दिली. दरम्यान, राव यांच्याकडून ससून रुग्णालयाबाबतचा स्वतंत्र अहवाल राज्य सरकारला पाठविला जाणार आहे.

विभागीय आयुक्त राव यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह ससून सर्वोपचार रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य सेवा, मनुष्यबळ, औषधपुरवठा आदींच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. या वेळी त्यांनी विविध औषधोपचार कक्षांना भेट देऊन पाहणी केली. या प्रसंगी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. मुरलीधर तांबे, डॉ. नरेश झंजाड, डॉ. संजय गायकवाड, डॉ. गिरीश बारटक्के, उपअधिष्ठाता डॉ. शेखर प्रधान, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण जाधव, वैद्यकीय उपअधीक्षक सुजीत धिवारे आदी उपस्थित होते.

हेही वाचा – पुणे: भरधाव चारचाकी वाहनाने सहा वाहनांना उडवले ; एका पादचाऱ्याचा मृत्यू

ससून रुग्णालयातून ललिल पाटील या कैद्याने पलायन केले होते. याबाबत राव म्हणाले की, या प्रकरणी सत्यता पडताळण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती उद्या (ता. ७) सायंकाळी पाचपर्यंत अहवाल सादर करणार आहे. त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. याचबरोबर रुग्णालयात असलेल्या कैद्यांचा अहवालही उद्या ही समिती देणार आहे. यातील प्रत्येक कैद्याला उपचाराची गरज आहे का, त्याला रुग्णालयात ठेवण्याची आवश्यकता आहे का, याची तपासणी केली जाईल. त्यानंतर या कैद्यांना उपचारासाठी रुग्णालयात ठेवायचे की कारागृहात पाठवायचे, हा निर्णय समिती घेईल.

या वेळी राव यांनी रुग्णालयात दाखल होणारी रुग्णसंख्या, रुग्णालयातील मनुष्यबळाचा आढावा घेतला. रुग्णालयातील औषधसाठा तसेच औषध खरेदीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांनी स्थानिक स्तरावर औषध खरेदी करण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयाला अत्यावश्यक व जीवनरक्षक औषधांच्या खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देता येईल, असेही ते म्हणाले.

रुग्णालयाच्या अनुषंगाने सविस्तर अहवाल मुख्य सचिवांना सादर करण्यात येणार असल्याचेही राव यांनी नमूद केले. या वेळी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी औषध कक्षाला भेट देऊन औषधसाठ्याची पाहणी केली. तसेच रुग्ण कैदी कक्ष क्रमांक १६ ला भेट देऊन पाहणी केली.

हेही वाचा – “सर्वात जास्त पैसेवाले लोकही या देशात ४० टक्के कर भरत नाहीत, मात्र…”, सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ललिल पाटीलचा आजार अन् उपचार गोपनीय

ललित पाटील प्रकरणात पहिल्यापासून मौन बाळगणारे ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी या प्रकरणी शुक्रवारी पहिल्यांदाच यावर भाष्य केले. मात्र, ललित पाटील याचा आजार गोपनीय असल्याचे सांगत त्याच्यावर उपचार करणाऱ्या सहा डॉक्टरांच्या पथकाची नावे सांगण्यासही त्यांनी नकार दिला. याचबरोबर ललितला पळून जाण्यात मदत कोणी केली हे शोधण्याचे काम पोलिसांचे असल्याचे सांगितले.