दुचाकीवरुन प्रवास करताना हेल्मेट वापरणे राज्य सरकारने सक्तीचे केले असले तरी पुणेकर या नियमाला फारसे जुमानत नसल्याचे चित्र आहे. हेल्मेट सक्तीविरोधात पुणेकर रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. मात्र, पिंपरी-चिंचवड महाविद्यालयाने हेल्मेट सक्तीची मोहीम काटेकोरपणे राबवली आहे. पिंपरी-चिंचवडमधील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कुल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजने शिक्षक आणि विद्यार्थ्यांना हेल्मेट सक्ती केली आहे. नुसती नियमावली करुन प्रशासन शांत बसलेले नाही. तर या नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले जाते. मागील तीन वर्षांपासून महाविद्यालय हेल्मेट सक्तीचे पालन करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी चिंचवडमधील दुचाकीच्या वाढत्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेऊन हा निर्णय महाविद्यालयाने घेतला आहे. विशेष म्हणजे शिक्षक, विद्यार्थी सक्तीच्या नियमावलीचे स्वरक्षणाची जबाबदारी म्हणून पालन करतात. याच महाविद्यालयातील एका शिक्षकाच्या मुलाचा  दुचाकी अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर या दु:खद घटनेची हळहळ व्यक्त करण्यापेक्षा अपघातानंतरची जोखीम टाळण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला. ज्युनिअर कॉलेजमध्ये एकूण ३०० विद्यार्थी आहेत. तसेच ८० कर्मचारी आहेत. सर्व कर्मचारी आणि काही विद्यार्थी दुचाकीने महाविद्यालयात येतात. नियमाचं उल्लंघन केल्यास शिक्षकांना दंडाच्या स्वरुपात एका दिवसाचे वेतन कपात करण्यात येते. तर विद्यार्थ्यांना पालकांसमोर समज देऊन लेखी हमी घेतली जाते, अशी माहिती प्राचार्य डॉ कांचन देशपांडे यांनी दिली.

शिक्षकांकडून दंड आकारल्याच्या घटनेबद्दल देशपांडे म्हणाल्या की, अभिजित कांबळे या शिक्षकाने हेल्मेट सक्तीचं उल्लंघन केल्यानंतर त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. याशिवाय आणखी पाच शिक्षकांकडून देखील दंड आकारण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये हेल्मेटअभावी जवळपास १५० दुचाकीस्वारांनी अपघातामध्ये जीव गमावला. राज्यातील हा आकडा अधिक आहे. याच पार्श्वभूमीवर नॉव्हेल इंटरनेशनल स्कुल नवा पायंडा घालून हेल्मेट वापरण्याचा एक सामाजिक संदेशच या उपक्रमातून देत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Without helmet no entry in this pimpri chinchwad college
First published on: 15-11-2017 at 17:24 IST