पुणे : कात्रज भागातील वंडर सिटीजवळ भरधाव ट्रकच्या धडके दुचाकीस्वार महिलेला धडक दिल्याची घटना रविवारी घडली. ट्रकने महिलेला फरफटत नेले. अपघातांतर घटनास्थळी न थांबता ट्रक चालक पसार झाला. उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला.
लहूबाई अश्रृबा वाघमारे (वय ४९,रा. वाघजाईनगर, आंबेगाव खुर्द, कात्रज) असे उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार महिलेचे नाव आहे. अपघातात आणखी एक दुचाकीस्वार महिला जखमी झाली आहे. प्रियंका राऊत (वय ३३) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.अपघातात राऊत यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातानंतर पसार झालेला ट्रक चालक नीलेश चांदगुडे (वय ३८,रा. इंदापूर) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार लहूबाई वाघमारे रविवारी दुपारी एकच्या सुमारास कात्रज बाह्यवळण मार्गावरुन नवले पुलाकडे निघाल्या होत्या. वंडर सिटीजवळ भरधाव ट्रकने दुचाकीस्वार लहूबाई यांना धडक दिली. ट्रकचालकाने दुचाकीस्वार लहूबाई यांना २०० मीटर फरफटत नेले. अपघातात त्या गंभीर जखमी झाले. त्या वेळी तेथून निघालेल्या दुचाकीस्वार प्रियंका राऊत यांना ट्रकने धडक दिली.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या लहुबाई यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ट्रकचालक चांदगुडे याला अटक करण्यात आली असून, वैद्यकीय तपासणीसाठी त्याला ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे, अशी माहिती आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी दिली.
आणखी किती बळी जाणार ?
अपघात झाल्यानंतर तेथे नागरिकांनी गर्दी केली. कात्रज बाह्यवळण मार्ग, तसेच तेथून काही अंतरावर असलेल्या मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. शनिवारी (३ मे) मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता. बाह्यवळण मार्ग धोकादायक झाला आहे. अवजड वाहने भरधाव वेगाने तेथून जातात. कात्रज भागात आणखी किती बळी जाणार, असा सवाल प्रत्यक्षदर्शी सुशांत मोरे यांनी उपस्थित केला.
कात्रज पुलाचे काम संथगतीने
कात्रज पुलाच्या दुरुस्तीसाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग (डायव्हर्जन)उपलब्ध करुन देण्यात आला होता. चार महिन्यांचा कालावधी झाल्यानंतर या पुलाचे काम पूर्ण झाले नाही, अशी माहिती कात्रज भागातील रहिवाशांनी दिली