पुणे : धुळ्यातील एका महिलेच्या नडगीच्या हाडावर गाठ आली. तिने आधी शस्त्रक्रिया करून ही गाठ काढून टाकली. तरीही गुंतागुंत निर्माण झाली. यामुळे तिची प्रकृती खालावल्याने अखेर तिला पुण्याला हलविण्यात आले. पुण्यातील डॉक्टरांनी केलेल्या उपचारामुळे दशकभरानंतर आणि गुंतागुंतीच्या पाच शस्त्रक्रियांनंतर या महिलेने दुर्मीळ विकारावर अखेर मात केली आहे.
या महिलेच्या डाव्या पायाच्या नडगीच्या हाडावर जायंट सेल ट्यूमर म्हणजेच पेशींची मोठी गाठ २०१५ मध्ये झाली. सुरुवातीला २०१६ मध्ये धुळ्यातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ही गाठ काढून टाकली. त्यानंतर काही वर्षांनी पुन्हा तिथे गाठ आली. त्यामुळे मुंबईतील रुग्णालयात शस्त्रक्रिया करून ही गाठ काढून टाकण्यात आली.
त्यावेळी हाडात निर्माण झालेली पोकळी भरण्यासाठी सिमेंटचा वापर करण्यात आला आणि हाडाला आधार देण्यासाठी प्लेट बसविण्यात आल्या. मात्र, काही काळानंतर हाडामध्ये औषध प्रतिरोधक मेथिसिलीन-रेसिस्टंट स्टॅफायलोकोकस ऑरेअस हा संसर्ग झाला. यामुळे ४ जून २०२२ रोजी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून हाडातील सिमेंट आणि प्लेट काढून टाकल्या. पुन्हा सिमेंट भरून प्लेट लावण्यात आल्या. एवढे करूनही पायातील जखम कायम राहिली.
पुण्यातील वेन्सर हॉस्पिटलमध्ये या महिलेला जुलै २०२४ मध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी अस्थिशल्यचिकित्सक डॉ. भूषण शितोळे यांनी तिच्यावर उपचार सुरू केले. सर्वप्रथम हाडातील संसर्ग दूर करण्यावर त्यांनी भर दिला. यासाठी त्यांनी व्हॅक्यूम असिस्टेड क्लोजर या पद्धतीचा वापर केला. डॉक्टरांनी निर्जंतुकीकरण करून संसर्ग पूर्णपणे थांबविण्याचे पाऊल उचलण्यात आले.
नंतर दोन आठवड्यांनी १६ जुलै २०२४ रोजी संसर्ग आटोक्यात आला. त्यानंतर हाडाचा खराब झालेला भाग काढून टाकून त्या ठिकाणी इम्प्लांट बसविण्यात आले. या शस्त्रक्रियेनंतर १ ऑक्टोबर २०२४ रोजी शस्त्रक्रियेचे टाके काढण्यात आले. या शस्त्रक्रियेनंतर उपचाराची प्रक्रिया कायम ठेवण्यात आली. अखेर वर्षभराने ही महिला कोणत्याही आधाराशिवाय चालू लागली आहे.
आम्ही सर्वप्रथम हाडातील संसर्ग थांबविण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर या महिलेच्या हाडातील खराब भाग काढून त्या ठिकाणी इम्प्लांट बसविण्यात आले. तिला पुन्हा चालता यावे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उपचाराचे नियोजन करण्यात आले. – डॉ. भूषण शितोळे, अस्थिशल्यचिकित्सक
मी आता कुटुंबीयांच्या आधाराशिवाय चालू शकत आहे. कोणी सोबत नसेल तर चालायचे कसे, ही माझ्यासाठी मोठी भीती होती. आता मला चालता येत असल्याने माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे. – महिला रुग्ण