पुणे : भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिशा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाकडून उपचारासाठी पैशांची अडवणूक केल्याने गर्भवती तनिशा यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणाची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली आहे.

पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केलेला हलगर्जीपणा, योग्य उपचार न दिल्याने २ जुळ्या मुलींना जन्म दिलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाने आयुक्त, पुणे महानगरपालिका यांना सदर प्रकरणी तथ्य तपासत चौकशी करुन कार्यवाही करण्याचे आणि आयोगास वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश रुपाली चाकणकर प्रशासनाला दिले आहेत.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने तनिशा भिसे यांच्या कुटुंबियांचे आरोप फेटाळले

तनिशा भिसे यांच्या घटनेसंदर्भात दीनानाथ रुग्णालयाकडून चौकशी केली जाणार आहे.या संदर्भातला अहवाल आम्ही राज्य सरकारला सादर करणार आहोत, माध्यमांमध्ये अर्धवट माहीतीसमोर आलेली आहे आणि यातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची बदनामी होत आहे.अशी भूमिका मांडत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी तनिशा भिसे यांच्या कुटुंबियांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

डॉक्टर आणि संबधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी : आमदार अमित गोरखे

तनिशा भिसे मृत्यू प्रकरणी डॉक्टर आणि संबधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई झाली पाहिजे. या मागणीसाठी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेतली आहे. या घटनेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सांगणार आहे. तसेच या घटनेच्या विरोधात येत्या काळात आवाज उठविणार असून कुटुंबियांना कशा प्रकारे मदत केली जाईल, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. अशी माहिती भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी दिली.

तनिशा भिसे यांच्या कुटुंबियांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर केलेले आरोप

तनिशा यांना प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी कुटुंबिय घेऊन गेले.त्यावेळी तेथील डॉक्टरांनी तनिशा यांची तपासणी केली आणि जुळ्या मुली आहेत. तसेच शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असल्याचे कुटुंबियांना सांगण्यात आले. या शस्त्रक्रियेकरीता २० लाख रुपयांचा खर्च येईल आणि सुरुवातीला किमान १० लाख रुपये तरी भरावे लागतील, असे कुटुंबियांना डॉक्टरांनी सांगितले. त्यावर आमच्याकडे सध्या २ ते ३ लाख असून आम्ही इतर पैशांची जुळवाजुळव करू पण आपण उपचार करावे अशी विनंती केली. पण दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने उपचार करण्यास नकार दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याच दरम्यान तनिशा यांची प्रकृती अधिकच खालवली. त्यानंतर सुशांत भिसे यांनी पत्नीला दुसर्‍या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण यामध्ये जवळपास तीन तासाचा कालावधी गेला आणि त्या रुग्णालयात तनिशा यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. पण पुढील काही मिनिटामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तनिशा यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांनी वेळेत उपचार दिले असते. तर आज तनिशा या मुलीसोबत आणि कुटुंबियासोबत राहिल्या असत्या, त्यामुळे तनिशा यांच्या मृत्यूला रुग्णालय प्रशासन जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे.