पुणे : पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना सहकारनगरमधील तुळशीबागवाले काॅलनीत घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीवरील दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला तुळशीबागवाले काॅलनीतील एका सोसायटीत राहायला आहेत. त्या शुक्रवारी (१५ ऑगस्ट) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तुळशीबागवाले काॅलनीतून निघाल्या होत्या. या भागतील ढोमकर पथ परिसरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ४० हजारांचे सोन्याचे दागिने हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसंनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

शहरात गेल्या काही महिन्यांपासून पादचारी महिलांकडील दागिने हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पादचारी ज्येष्ठ महिलांकडे पोलीस असल्याची बतावणी, तसेच मोफत साडीवाटप करण्यात येत असल्याचे आमिष दाखवून चोरटे त्यांच्याकडील दागिने लांबवून पसार होण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.

पीएमपी प्रवासी महिलांकडील एक लाखांचा ऐवज लंपास

पीएमपी प्रवासी महिलांकडील ऐवज लांबविण्याचे सत्र कायम आहे. कर्वे रस्ता परिसरातील पीएमपी थांब्यावर बसमध्ये प्रवेश करताना एका ज्येष्ठ महिलेकडील ६० हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याबाबत ज्येष्ठ महिलेच्या पतीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ज्येष्ठ महिला मूळच्या अहिल्यानगरमधील आहेत. त्या कामानिमित्त पुण्यात आल्या होत्या. कर्वे रस्त्यावरील पीएमपी थांब्यावर त्या थांबल्या होत्या. त्या वेळी बसमध्ये प्रवेश करताना महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरट्यांनी कटरचा वापर करुन लांबविली. सहायक फौजदार गमाले तपास करत आहेत.

स्वारगेट पीएमपी स्थानक परिसरात एका महिलेच्या पिशवीतून ३३ हजारांची रोकड चोरट्यांनी लांबविली. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला लोहगावमधील खेसे आळीत राहायला आहेत. त्या स्वारगेट स्थानकातून पीएमपी बसमधून ७ ऑगस्ट रोजी निघाल्या होत्या. त्या वेळी चोरट्याने त्यांच्या पिशवीतून रोकड लांबविली. पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत. स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर, हडपसर भागातील पीएमपी स्थानक परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. गर्दीच्या मार्गावरील बसमध्ये प्रवेश करुन चोरटे ऐवज लांबवितात.