महिला व बाल कल्याण समितीच्या अनपेक्षित भेटीत उघड; महापौर,आयुक्तांकडे तक्रार

महापालिकेकडून दरमहा दोन लाख रुपयांचे अनुदान घेऊन चालविल्या जात असलेल्या अनाथ मुलांच्या घरटं प्रकल्पाची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे महिला व बाल कल्याण समितीने दिलेल्या अनपेक्षित भेटीमध्ये आढळून आले. निकृष्ट अन्न, शौचालय व स्नानगृहांची दुरवस्था यासह अनेक बाबी या भेटीत दिसून आल्या.

येरवडा येथे जॉन पॉल स्लम डेव्हलपमेंट प्रोजेक्ट अंतर्गत महापालिकेच्या अनुदानातून घरटं प्रकल्प चालविला जातो. रस्त्यावर सापडलेल्या, तसेच अनाथ मुलांचे संगोपन या प्रकल्पामध्ये केले जाते. महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्यांनी या प्रकल्पाला अचानक भेट दिली. त्या वेळी या प्रकल्पाचे कामकाज अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचे त्यांना दिसून आले. त्याबाबत त्यांनी महापौर, पक्षनेते आणि आयुक्तांकडे तक्रार केली आहे. या भेटीसंबंधीची माहिती महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष उषा कळमकर यांनी दिली. या वेळी माधुरी सहस्त्रबुद्धे, मंजूषा नागपुरे, आशा साने उपस्थित होत्या.

घरटं प्रकल्पातील धान्याच्या पिठामध्ये मोठया आळ्या दिसून आल्या. त्याबरोबर भाज्या अत्यंत खराब स्थितीमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. मुलांना दिला जाणारा मांसाहार अत्यंत निकृष्ट, वास येणारा आणि घाणेरडा होता. मुलांसाठी असलेले शौचालय व स्नानगृह अतिशय घाणेरडय़ा आणि खराब अवस्थेत असल्याचे आढळून आले, अशी माहिती उषा कळमकर यांनी दिली.

मुलांच्या शारीरिक स्वच्छतेची अवस्थादेखील वाईट असल्याचे दिसले. आठवडयातून केवळ दोनदा अंघोळ घातली जात असल्याचे मुलांनी सांगितले. मुलांच्या अंगावरील कपडे अत्यंत खराब होते. घरटं प्रकल्पाची ही दयनीय अवस्था पाहून समितीच्या सर्व सदस्या व्यथित झाल्या.

लहान व कोवळया मुलांना अशा वाईट परिस्थितीमध्ये ठेवणाऱ्या घरटे प्रकल्प चालविणाऱ्या संस्था चालकांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी, तसेच संबंधित संस्थेकडील काम काढून घेऊन दुसऱ्या एखाद्या चांगल्या संस्थेकडे द्यावे, अशी मागणी महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने करण्यात आली आहे.