पुणे : महिलांचा कल अलीकडे उशिरा मातृत्वाकडे वळू लागला आहे. नोकरीसह इतर अनेक कारणांमुळे महिलांकडून मातृत्वाचा निर्णय लांबणीवर टाकला जात असल्याचे चित्र आहे. यातून या महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढू लागला आहे. यामुळे महिलांनी वेळीच मातृत्व स्वीकारावे, असा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञांसह कर्करोगतज्ज्ञांनी दिला आहे.

सध्या पती व पत्नी दोघेही नोकरी करणारे असतात. त्यामुळे त्यांना लग्नानंतर लगेच मुलाची जबाबदारी नको असते. आर्थिक स्थैर्य आल्यानंतर मुलाचा निर्णय घेण्याचे नियोजन अनेक जोडपी करतात. यामुळे अलीकडे उशिरा मातृत्व स्वीकारण्याकडे कल वाढू लागला आहे. यातून महिलांना अनेक आरोग्यविषयक धोके निर्माण होत आहेत. याबाबत रूबी हॉल क्लिनिकमधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कोमल भादू म्हणाल्या की, महिला आता आधुनिक जीवनशैली आणि व्यावसायिक कारकिर्दीला प्राधान्य देतात. यामुळे मातृत्वाचा निर्णय घेण्यास उशीर केला जातो. उशिरा मातृत्वामुळे अंडाशयाचा म्हणजेच गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो, हे वैद्यकीय संशोधनातून समोर आले आहे.

उशिरा मातृत्व अथवा मातृत्व न स्वीकारलेल्या महिलांमध्ये अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका जास्त प्रमाणात असतो. प्रत्येक मासिक पाळी चक्रातून अंडाशय जात असते. त्याचा त्यावर मोठा परिणाम होत असतो. गर्भारपण आणि स्तनपानाच्या काळात हे चक्र थांबते आणि अंडाशयाची होणारी हानीही थांबते. यामुळे मासिक पाळीचे चक्रही कमी होऊन अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. याचबरोबर गर्भारपणाच्या काळात शरीरात स्रवणारे प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक अंडाशयाच्या अयोग्य पेशी नष्ट करतात. त्यामुळेही महिलांना कर्करोगापासून संरक्षण मिळते, असे डॉ. भादू यांनी स्पष्ट केले.

गेल्या दोन दशकांत वाढ

याबाबत एमओसी पुणे केंद्रातील कर्करोगतज्ज्ञ डॉ. रितू दवे म्हणाल्या की, गेल्या दोन दशकांत उशिरा विवाह आणि मातृत्व याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अनेक महिला त्यांच्या मुलांना स्तनपान अतिशय कमी देतात अथवा ते टाळतात. ही परिस्थिती विशेषत: महानगरांमध्ये दिसून येत आहे. उशिरा मातृत्वामुळे महिलांमध्ये अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. मासिक पाळीमध्ये दर महिन्याला महिलेच्या शरीरात अनेक बदल घडत असतात. महिला गर्भवती होत नाही, तोपर्यंत हे बदल सुरू असतात. एखादी महिला गर्भवती राहिल्यानंतरचे नऊ महिने आणि नंतरचे स्तनपानाचे सहा महिने असे एकूण १५ महिने तिच्या शरीरात मासिक पाळीमुळे होणारी हानी थांबते. याबाबत अनेक संशोधने प्रसिद्ध झाली असून, त्यातून ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे.

मातृत्व स्वीकारताना काळजी काय घ्यावी?

– मातृत्व योग्य वयात स्वीकारण्याचा प्रयत्न करावा.

– स्त्रीरोगतज्ज्ञांकडून नियमितपणे तपासणी करावी.

– महिलांनी त्यांच्यातील लक्षणे वेळोवेळी तपासावीत.

– कर्करोगाचा धोका शोधण्यासाठी जनुकीय तपासणी करून घ्यावी.

– उशिरा मातृत्वाबद्दल आधी पुरेशी माहिती आणि दुष्परिणाम जाणून घ्यावेत.