कौटुंबिक वादातून पतीचा खून करून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी एका महिलेस अटक केली आहे.

रमेश भिसे (वय ४४, रा. लांडगे निवास, उत्तमनगर, एनडीए रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी नंदिनी रमेश भिसे (वय ४०) हिला अटक करण्यात आली आहे. रमेश भिसे आणि त्याची पत्नी भाड्याने खोली घेऊन राहत होते. दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाले. भिसेला दारू पिण्याचे व्यसन होते. तो पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत असे. तो काही कामधंदा करत नव्हता. मध्यरात्री नंदिनीने पती रमेश याचा नायलाॅनच्या दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर तिने त्याच्या गळ्यात दोरी बांधून ती घरातील हुकाला अडकवली. पतीने आत्महत्या केल्याचा बनाव तिने रचला. पतीने आत्महत्या केल्याचे तिने मुलगा तसेच नातेवाईकांना सांगितले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहाय्यक आयुक्त रुक्मिणी गलांडे, उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर, गुन्हे शाखेतील निरीक्षक अर्जुन बोत्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. भिसेचा मृतदेह ससून रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदनात भिसेचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी पत्नी, मुलगा, नातेवाईकांची चौकशी केली. चौकशीत नंदिनीने पतीचा खून केल्याचे निष्पन्न झाले. पती चारित्र्याचा संशय घेऊन अपमान करायचा. तो काही कामधंदा करत नव्हता तसेच दारूला पैसे मागायचा, असे तिने पोलिसांना सांगितले. पतीच्या त्रासामुळे त्याचा खून केल्याची कबुली तिने दिली. नंदिनीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सहाय्यक निरीक्षक दादाराजे पवार तपास करत आहेत.

पाच दिवसांपूर्वी कात्रज भागात चारित्र्याचा संशय घेणाऱ्या पतीचा एका महिलेने दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली होती. तिने पतीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी महिलेसह तिच्या अल्पवयीन मुला विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता.