अंगावर सोन्याचे दागिने,लग्नातील शालू,हातावर मेहंदी, टिकली.. असा नववधूचा पेहराव करुन एका विवाहित तरुणीने आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आली आहे. तिला बाळ होणार नाही अस डॉक्टरांनी सांगितल होत. याच कारणामुळे पतीकडून वारंवार होत असणाऱ्या छळाला कंटाळून नैराश्येतून तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विद्या शैलेश पारधी (वय २४) असं आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षापूर्वी विद्याचा शैलेशशी प्रेम विवाह झाला होता. ते सुखाने संसार करत होते. परंतु त्यांचा सुखी संसाराला दृष्ट लागली जेव्हा डॉक्टरांनी विद्या आई होऊ शकत नाही असं सांगितले. विद्या आपल्याला मूल देऊ शकत नाही हे समजल्यापासून पती शैलेशबरोबर वारंवार तिचे खटके उडायचे. शैलेश हा व्यसनी होता. त्यामुळे नशेच्या धुंदीत घरी आल्यावर तो तिला खूप त्रास देत असे. तर दुसरीकडे आई वडीलांच्या मर्जी विरोधात प्रेम विवाह केल्याने ती आई वडीलांपासून दुरावली होती. त्यामुळेच ती पती आणि आपल्या आई वडीलांपासून वेगळं होऊन एका जवळच्या मैत्रिणीकडे राहात होती. आपले दु:ख सांगण्यासाठी तीला जवळचं असं कोणीच नव्हतं. यातूनच आलेल्या नैराश्येमुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

शनिवारी रात्री उशीरा विद्याने पतीच्या घरी आत्महत्या केली. आत्महत्या केली तेव्हा तिच्या अंगावर सोन्याचे दागिने, लग्नात नेसलेला शालू, हातावर मेहंदी, डोक्यावर टिकली होती. आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तिने ‘आई-बाबा मला माफ करा. शैलेश तुम्ही दुसरा विवाह करा, पण तिला (दुसऱ्या पत्नीला) त्रास देऊ नका. माझं नशीबच खराब आहे’ असा मजकूर लिहून ठेवला आहे. या घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.