लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पतीला धडा शिकविण्यासाठी त्याच्या कंपनीची कार बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा ई-मेल महिलेने पाठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी फरहीन अलरुमान शेख (वय ३३, रा. कोंढवा) या महिलेला अटक केली आहे. याबाबत खराडी येथील ऑल स्टेट कंपनीच्या व्यवस्थापकाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कंपनीत ११ जून रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता घडला.

ऑल स्टेट कंपनीमध्ये अलरुमान शेख (वय ३२) हे कामाला आहेत. त्यांनी दुसरे लग्न केले. त्यातून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. अलरुमान याची नोकरी जाण्याच्या हेतूने तिने पतीचा मेल आय डी वापरुन फिर्यादीच्या कंपनीच्या मेलवर मेल पाठविला. त्यात कंपनीचे ऑफिस व कार उडविण्याची धमकी दिली. मेल पाहताच फिर्यादी यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने कंपनीच्या सर्व कार्सची बॉम्ब शोधक नाशक पथकाकडून तपासणी केली. त्यात काहीही आढळून आले नाही. त्यानंतर शोध घेतला असता फरहीन हिने हा मेल केल्याचे उघड झाल्याने तिला पोलिसांनी अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे तपास करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.