पुणे : बाणेर परिसरातील नागरिकांना फायद्याच्या ठरणाऱ्या ननवरे चौकातील विकास आराखड्यातील (डीपी) रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. या भागात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने मोठे पाऊल उचलले असून येथील अर्धवट रस्ता पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष समीर चांदेरे यांनी यामध्ये पुढाकार घेतला. हा रस्ता व्हावा, यासाठी महापालिका प्रशासनाकडे सतत करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे रस्ता करण्याचा हा मार्ग मोकळा झाला आहे.

बाणेर येथील पॅनकार्ड क्लब रस्ता ते ननवरे चौक दरम्यानचा २४ मीटर डीपी रस्ता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांतून पूर्णत्वास गेला होता. परंतु, या मार्गाचा अखेरचा टप्पा असणारा ननवरे चौकाला जोडणारा १०० मीटर डीपी रस्ता अर्धवट राहिल्याने परिसरातील नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत होता. हा रस्ता होत नसल्याने नागरिकांना, वाहनचालकांना बिटवाईज चौकातून वळसा घ्यावा लागत होता. यामुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडत होती.

हा अर्धवट राहिलेल्या रस्त्यातील अडचणी बाबूराव चांदेरे आणि समीर चांदेरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तत्कालीन महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना उपमुख्यमंत्री पवार यांनी लक्ष घालण्यास सांगितले होते. मात्र त्यानंतर काही दिवसांमध्येच आयुक्त भोसले हे सेवानिवृत्त झाल्याने हा विषय मागे पडला होता.

गेल्या आठवड्यात स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी असलेले बाबुराव चांदेरे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान चांदेरे यांनी बाणेर येथील या प्रलंबित रस्त्याच्या कामाबद्दल चर्चा केली होती. त्यानंतर आयुक्त नवल किशोर राम यांनी यामध्ये लक्ष घालून आवश्यक त्या सूचना महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना केल्या. त्यामुळे रस्त्याच्या कामातील अडचणी दूर झाल्या असून, रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

याबाबत बोलताना बाबुराव चांदेरे म्हणाले, बाणेर येथील ननवरे चौकातील हा रस्ता पूर्ण झाल्याने महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. नागरिकांच्या सततच्या मागणीला न्याय देणे ही माझी जबाबदारी होती. या कामामुळे वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. याबाबतीत वाहन चालकांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.