पिंपरी-चिंचवड, चाकणसह तळेगाव औद्योगिक पट्टय़ात
औद्योगिक मंदीमुळे पिंपरी-चिंचवड, चाकणसह तळेगाव औद्योगिक पट्टय़ातील लघु उद्योजकांना मोठा फटका बसला आहे. काम कमी झाल्यामुळे लघु उद्योजकांनी कामगारांची दिवाळीची सुटी वाढविली असून दरवर्षी दिली जाणारी तीन ते चार दिवसांची सुटी यंदा सक्तीने एक आठवडय़ाची करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरात शेकडो मोठे आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले हजारो कारखाने आहेत. याशिवाय चाकण आणि तळेगाव परिसरातही मोठय़ा संख्येने कंपन्या आहेत. तेथेही या कंपन्यांवर हजारो लघु उद्योग अवलंबून आहेत. वाहन उद्योगातील सर्वच कंपन्यांना मंदीचा मोठा फटका बसला आहे. अनेक कंपन्यांनी मंदीमुळे ‘ब्लॉक क्लोजर’ घेऊन कंपन्या बंद ठेवण्याचे धोरण अवलंबविले होते. त्याचा परिणाम लघु उद्योजकांवर झाला. मोठय़ा कंपन्यावर आधारित लघु उद्योगांमधील काम कमी झाले. त्यामुळे लघु उद्योजक आर्थिक संकटात सापडले आहेत. दिवाळीच्या दिवसांत कामगारांना बोनस, उचल यांसह नियमित पगार देण्यासाठी लागणाऱ्या पैशांची चणचण भासू लागली आहे. त्यामुळे लघु उद्योजक मेटाकुटीला आले आहेत. चाकण, पिंपरी, भोसरी, तळेगाव, चिखली, तळवडे, कुदळवाडी आदी परिसरात दहा हजारांपेक्षा जास्त लघु उद्योग आहेत. या लघु उद्योगांमध्ये लाखो कामगार काम करतात. या कामगारांना दिवाळीच्या सणासाठी प्रत्येक वर्षी तीन ते चार दिवसांची सुटी दिली जात होती. ती सुटी साप्ताहिक सुटय़ा कमी करून भरून काढली जात असे. या वर्षी काम नसल्याने लघु उद्योजकांनी कामगारांना २५ ते ३१ ऑक्टोबर अशी एक आठवडय़ाची सक्तीची सुटी दिली आहे. कामगारांना देण्यात येणारा बोनस, पगार देताना उद्योजकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
लघु उद्योगांमध्ये काम नसल्यामुळे या वर्षी कामगारांना दिली जाणारी दिवाळीची सुटी वाढविण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी तीन ते चार दिवसांची सुटी असते. या वर्षी सक्तीने आठ दिवसांची सुटी करण्यात आली आहे. – संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघु उद्योग
संघटना या वर्षी मंदीमुळे कामगारांच्या दिवाळी सुटीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. कामगारांना दिवाळीचा बोनस म्हणून एक पूर्ण पगार दिला जात होता. यंदा पगाराच्या ५० टक्के रक्कम बोनस म्हणून दिली गेली आहे. – जयंत कड, लघु उद्योजक, कुदळवाडी, चिखली
गेल्या तीन महिन्यांपासून पुरेसे काम नाही. चार ते पाच तास कंपनी सुरू ठेवून कामगारांचे सरासरी आठ तास धरले आहेत. काम नसल्यामुळे कामगारांना आम्ही नऊ दिवसांची सुटी दिली आहे. कामगारांना बोनस दिलेला नाही. – भारत नरवडे, लघु उद्योजक, कुदळवाडी, चिखली