पुणे : राज्यातील अष्टविनायकांचे दर्शन आता एका दिवसात घेता येणे शक्य झाले आहे. चारचाकी वाहनाने यापूर्वी दर्शनासाठी ४८ तास लागायचे, मात्र आता हा अवधी निम्म्याने कमी झाल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) केला आहे. अष्टविनायकांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून प्रवासात येणारे व्यत्यय, मार्गांवरील अडथळे दूर करण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> पुणे-मुंबईदरम्यान रेल्वेसेवा विस्कळीत; लोणावळ्यानजीक तांत्रिक बिघाडाचा फटका

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांबरोबरच अष्टविनायकांच्या दर्शनासाठी भाविकांची नेहमीच गर्दी होत असते. अष्टविनायक गणपतींची आठ मंदिरे आहेत. त्यापैकी मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर आणि लेण्याद्री ही पाच मंदिरे ही पुणे जिल्ह्यात, सिद्धटेक नगर, तर महाड आणि पाली येथील मंदिरे रायगड जिल्ह्यात आहेत. या ठिकाणी राज्याच्या विविध भागांतून आणि देशभरातून भक्तमंडळी येत असतात. या नागरिकांचा प्रवास सुखकर आणि कमी वेळेत व्हावा, या उद्देशाने पीडब्ल्यूडीने अष्टविनायक मंदिरांच्या रस्त्यांच्या जोडणीचा कार्यक्रम हाती घेतला होता. ही कामे पूर्ण झाली आहेत.

हेही वाचा >>> पिंपरी- चिंचवड : स्पा सेंटरवर छापा, चार तरुणींची सुटका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत बोलताना पीडब्ल्यूडीचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर म्हणाले, ‘अष्टविनायकांच्या दर्शनासाठी असणारी गर्दी आणि प्रवासासाठी लागणारा वेळ पाहून पीडब्ल्यूडीने अष्टविनायक मंदिरांचे मार्ग जोडण्यास सुरुवात केली. या अंतर्गत २५२ किलोमीटरचे रस्ते विकास आणि जोडण्यात आले आहेत. या कामासाठी सप्टेंबर २०१८ मध्ये राज्य शासनाची मंजुरी मिळाली होती. त्याकरिता ९०० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. निविदा प्रक्रियेद्वारे खासगी कंपनीकडून काम करण्यात आले. या मार्गांवरील रस्त्यांची दुरुस्ती, रस्ता रुंदीकरण, मजबुतीकरण आदी कामे पूर्ण करण्यात आली आहेत.’ अष्टविनायक मंदिरांचा संपूर्ण मार्ग ६५४ कि.मीचा आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अखत्यारित येणारे महामार्गांची सुधारणा सुरू असतानाच पीडब्ल्यूडीने या मार्गावरील २५२ कि.मीचे जाळे जोडण्यास सुरुवात केली होती. हे काम पूर्ण झाल्याने अष्टविनायक गणेशांच्या दर्शनासाठी यापूर्वी लागणारा दोन दिवसांचा कालावधी निम्म्याने कमी होऊन आता अवघ्या २४ तासांत आणि सुखकर प्रवास करता येणे शक्य झाले आहे, असेही बहिर यांनी स्पष्ट केले.