पुणे- मुंबईदरम्यान रोजचा प्रवास करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थामध्ये अळ्या आढळून आल्याची तक्रार एका प्रवाशाने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. १९ जुलैला हा प्रकार घडला असला, तरी रितसर तक्रारीबाबत पुरेशी माहिती नसल्याने रेल्वे प्रवासी ग्रुपच्या माध्यमातून या प्रवाशाने बुधवारी (२१ ऑगस्ट) याबाबत तक्रार दाखल केली. प्रवाशाच्या तक्रारीनुसार चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षां शहा आणि प्रवासी सागर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे हे १९ जुलैला डेक्कन क्वीनने मुंबईहून पुण्याकडे येत होते. प्रवासादरम्यान त्यांनी डायनिंग कारमध्ये आमलेटची मागणी केली. त्यांना मिळालेल्या आमलेटचा दर्जा चांगला नव्हता. त्याबरोबरच मिळालेला सॉस आणि मिरपूड पाहिल्यानंतर काळे यांना धक्काच बसला. मिरपूडच्या बाटलीमध्ये अळ्या आणि किडे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या प्रकाराचे सर्व प्रवाशांसमोर मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. डायनिंग कारचालक ठेकेदाराच्या जबाबदार कर्मचाऱ्यांशीही त्यांनी संपर्क साधून त्याबाबतची माहिती दिली. मात्र, त्यांना कोणीही दाद दिली नाही. रेल्वेतील खानपान व्यवस्थेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी इंडियन रेल्वे केटिरग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची (आयआरसीटीसी) असल्याने गाडीत उपस्थित आशिष नावाच्या प्रतिनिधीशीही त्यांनी संपर्क केला. मात्र, तेथेही त्यांना योग्य मदत मिळाली नाही. तक्रार करण्यासाठी पुस्तिकेची मागणी केली असता तीही त्यांना मिळाली नाही.

कोणीच दाद देत नसल्याने याबाबत रितसर तक्रार दाखल करण्याबाबत काळे यांच्याकडून माहिती घेतली जात होती. पुणे- मुंबई रोडचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून काळे यांना मुंबईत तक्रार देण्याचा सल्ला दिला. त्याचप्रमाणे प्रवासी ग्रुपच्या शहा यांच्याशी संपर्क करण्याबाबतही मार्गदर्शन केले. त्यानंतरच्या काळात पावसामुळे दीर्घकाळ रेल्वे रद्द झाल्यानंतर काळे यांना तक्रारीसाठी संधी मिळाली नाही. गाडय़ा पुन्हा सुरू झाल्यानंतर त्यांनी शहा यांच्याशी संपर्क साधला. शहा यांनी काळे यांना मार्गदर्शन करून बुधवारी पुणे रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडे रितसर तक्रार दाखल केली.

डेक्कन क्वीनसारख्या ऐतिहासिक गाडीच्या डायनिंग कारमधील खाद्यपदार्थात अळ्या आढळण्याचा प्रकार संतापजनक आहे. रेल्वे प्रशासन काय करते, असा प्रश्न त्यातून निर्माण होतो. खानपान व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या ‘आयआरसीटीसी’ची यात मोठी चूक आहे. खानपानाचा दर्जा आणि प्रवाशांच्या तक्रारीबाबत त्यांच्याकडून लक्ष दिले जात नाही, ही बाबत निषेधार्ह आहे. या प्रकरणाबाबत आपण वरिष्ठ पातळीवर तक्रार दाखल केली आहे.

– हर्षां शहा, रेल्वे प्रवासी ग्रुप अध्यक्षा