यास्मिन शेख यांचे परखड मत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या नववीतील मुलाला जोडाक्षरे लिहिता येत नाहीत, हे पाहून शाळेत कसे शिकवत असतील असा प्रश्न पडतो. इंग्रजी शाळेत शिकत असलेल्या माझ्या नातीला मराठी विषय होता. ‘व्यक्तिमत्त्व’ हा शब्द तिला उच्चारता येत नव्हता, पु. ल. देशपांडे माहीत नव्हते. मराठी भाषेची अशा प्रकारची विटंबना शाळांमधून होते व त्याची आपल्याला खंत वाटत नाही,’ असे परखड मत ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ यास्मीन शेख यांनी व्यक्त केले.

‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’च्या (मसाप) १११ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने यास्मिन शेख यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां पुष्पा भावे यांच्या हस्ते ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, या वेळी त्या बोलत होत्या.

या वेळी डॉ. सु. प्र. कुलकर्णी यांचा ‘भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला. राजा फडणीस पुरस्कृत ‘उत्कृष्ट मसाप शाखा’ हा सन्मान चाळीसगाव शाखेस मिळाला, तर रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ नंदा सुर्वे आणि नंदकुमार सावंत यांना ‘मसाप कार्यकर्ता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच कार्यक्रमात ‘मसाप’च्या सोलापूर शाखेचा अमृतमहोत्सवी वाटचालीबद्दल सत्कार करण्यात आला.  ‘मसाप’च्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार या वेळी उपस्थित होते.

शेख म्हणाल्या,‘हिंदी आणि इंग्रजीचा अतिरिक्त वापर इतका केला जातो, की त्यामध्ये मराठी भाषेची अक्षरश: चिरफाड केली जाते. आजची तरुण पिढी इंग्रजीच्या आहारी गेली आहे. त्यांना मराठी ही आपली भाषा वाटतच नाही. इंग्रजी आले तरच मुलांना पुढे निरनिराळ्या ठिकाणी नोक ऱ्या मिळतात, प्रतिष्ठा मिळते. मराठी माध्यमातून शिकणाऱ्याला तुच्छतेने वागवले जाते. पश्चिम बंगालमध्ये पहिली ते दहावी इयत्तांमध्ये माध्यम कोणतेही असले तरी बंगाली भाषा हा विषय सक्तीचा करण्यात आला आहे. ही बातमी वाचल्यावरच आपण जागे होतो. वास्तविक मराठी भाषेच्या बाबतीतही हे व्हायला हवे.’

‘इंग्रजी शाळेत जाणाऱ्या मुलांचे आई-वडील त्यांच्याशी तोडके-मोडके का होईना, पण इंग्रजीत बोलतात. मुलांना इंग्रजी शिकू द्या, परंतु त्यांच्या मनात आपल्या मातृभाषेविषयी प्रेम निर्माण करण्याची जबाबदारी पालकांचीही आहे.

व्याकरण हा विषय रुक्ष नसून तो ज्या पद्धतीने शिकवला जातो त्यामुळे त्याविषयी विद्यार्थ्यांना तिरस्कार वाटत असावा,’ असेही शेख म्हणाल्या.

‘भाषा हे कुणाच्या गर्वाचे साधन नव्हे, तर ते अधिक ‘माणूस’ होण्याचे साधन आहे. भाषा व व्याकरण हे आपल्याकडे राजकारणात गुंतलेले आहे. वेगवेगळ्या समुदायांना ‘आपली भाषा’ आणि ‘त्यांची भाषा’ असे वाटू लागते आणि त्यातून जे वाद निर्माण होतात ते बरेचसे गैरसमजुतीतून होतात. सामुदायिक अस्मितेचे प्रश्न टोकदार झाल्यावर किंवा ते तसे भासवले गेल्यावर, भाषा व व्याकरण हा वेगळ्या अर्थाने वादंगाचा विषय झाला आहे,’असे मत पुष्पा भावे यांनी व्यक्त केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yasmin shaikh get lifetime achievement award
First published on: 28-05-2017 at 04:12 IST