पुणे : राज्यातील गरजू रुग्णांना दैनंदिन रक्तसाठा, रक्तदान शिबीरे तसेच इतर बाबींची माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र शासनाने ई-रक्तकोष पोर्टल विकसित केले असून यावर सर्व रक्त केंद्रामार्फत माहिती अद्ययावत करण्यात येते. त्यामुळे थॅलेसिमिया, हिमोफिलीया, सिकलसेल व रक्ताशी निगडीत इतर आजारांच्या गरजू रुग्णांना रक्तासाठी धावपळ करावी लागू नये म्हणून रक्ताविषयी माहिती http://www.eraktkosh.mohfw.gov.in वर एका क्लिकवर सहजरित्या आता उपलब्ध झाली आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम प्राधान्याने सुरू करण्यात आला आहे या सेवेचा गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

राज्यामध्ये शासकीय, निमशासकीय, ट्रस्ट, कार्पोरेशन, प्रायव्हेट अशा एकूण ३९५ रक्तपेढ्यांचे/रक्तकेंद्रांचे खूप मोठे जाळे असून रुग्णाला वेळेत रक्त मिळण्यासाठी आता आपल्या मोबाईलवर ई-रक्तकोष पोर्टल मार्फत सद्यस्थितीत असलेला रक्ताच्या साठ्याची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे. आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या पुढाकाराने याचा फायदा वारंवार रक्ताची गरज असणारे रुग्ण उदाहरणार्थ, थॅलेसेमिया, सिकलसेल, हिमोफिलिया, कॅन्सर इत्यादी रुग्णांना तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांना वेळेत रक्त उपलब्ध करून देणे सोयीचे होणार आहे.

या रुग्णांसोबतच मोठ्या शस्त्रक्रियांच्या रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. ज्या रुग्णांचे रक्त निगेटिव्ह गटाचे आहे त्यांनाही या पोर्टलद्वारे रक्ताच्या उपलब्धतेची माहिती मिळणार आहे. या पोर्टलद्वारे रक्तदात्यांना जवळचे रक्त केंद्र रक्तपेढी तसेच रक्त शिबिराची माहिती सहज उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्र रक्त संकलनामध्ये देशात प्रथम क्रमांकावर आहे. मागील वर्षी अंदाजे २१ लाख रक्तदात्यांनी राज्यात रक्तदान केले आहे. या रक्त संकलनातून मोठ्या प्रमाणात रक्त घटक तयार करण्यात आले, ज्यामध्ये पॅक्ड रेड ब्लड सेल, प्लेटलेट कॉन्सन्ट्रेट ,फ्रेश फ्रोजन प्लाज्मा याचा समावेश असून सदर रक्त घटक आवश्यकतेनुसार रुग्णांसाठी वापरण्यात आले आहेत. राज्य रक्त संकलन परिषदेने हे रक्त व रक्त घटकाच्या प्रोसेसिंग चार्जेसचे दर निश्चिती केलेली आहे. या दर निश्चितीच्या मर्यादेतच रक्त केंद्रांना रुग्णासाठी रक्तपुरवठा करणे बंधनकारक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रक्तदान शिबिरांचा मोठा वाटा

महाविद्यालये, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, धार्मिक संस्था, गणेश मंडळे, कार्पोरेट ऑफिसेस इत्यादींच्या माध्यमातून तसेच वारंवार रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या मार्फत रक्त संकलन मोठ्या प्रमाणात करण्यात येते. सुदृढ रक्तदाता दर तीन महिन्यांनी रक्तदान करू शकतो. राज्यामध्ये शंभर पेक्षा अधिक वेळा रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची मोठी संख्या आहे. ‘रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान, महान दान’ या संकल्पनेतून मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे आयोजित होतात. राज्यात सुरक्षित रक्ताचा पुरेसा साठा योग्य दरात उपलब्ध होणे यासाठी राज्य रक्त संकलन परिषद नियमित कार्यरत आहे.