पुण्यातल्या बंद फ्लॅटमध्ये तरुण जोडप्याचे मृतदेह आढळून आले आहेत. पुण्यातल्या लोहगाव भागात ही घटना घडली आहे. २३ वर्षांचा तरुण आणि त्याची २१ वर्षांची पत्नी असे दोघेजण लोहगाव येथील इमारतीत भाडे तत्त्वावर राहात असलेल्या त्यांच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले आहेत. त्यांचे मृतदेह सडण्यास सुरुवात झाली होती. डबल बेडवर हात बांधलेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह आढळले आहेत. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.
पोलिसांनी काय म्हटलं आहे?
विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरण महादेव बोबडे (वय -२३) आणि आरती महादेव बोबडे (वय-२१) या दोघांचे मृतदेह त्यांच्याच घरात आढळले आहेत. किरण बोबडे पोस्टात कंत्राटी तत्त्वावर काम करत होता. तर आरती एका खासगी बँकेत काम करत होती.
सोमवारी (५ नोव्हेंबर) स्थानिकांकडून पोलीस कंट्रोल रुमला फोन आला. त्यात सोसायटीच्या एका फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचं सांगितलं. यानंतर ११ वाजण्याच्या सुमारास लोहगाव या ठिकाणी ज्या इमारतीतल्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत होती तिथे पोलीस पोहचले. या दोघांनी दोन-तीन दिवसांपासून घराचा दरवाजा उघडला नाही. आता त्यांच्या घरातून दुर्गंधी येते आहे असं सोसायटीतल्या लोकांनी सांगितलं. ज्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडला. दरवाजा तोडून पोलीस आतमध्ये गेले तेव्हा त्यांना किरण आणि आरती या दोघांचे मृतदेह आढळून आले. आम्ही जेव्हा त्या दोघांचे मृतदेह पाहिले तेव्हा ते हात बांधलेल्या अवस्थेत होते आणि दोघांचेही मृतदेह सडू लागले होते असं विमानतळ पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. इंडियन एक्स्प्रेसने याविषयीचं वृत्त दिलं आहे.
हत्या की आत्महत्या लगेच सांगता येणं कठीण
पोलिसांच्या म्हणणं आहे की प्राथमिक अंदाजानुसार हे प्रकरण कसलं आहे हे सांगणं थोडं कठीण आहे. कारण घरात सक्तीने कुणीही घुसल्याच्या खुणा नाहीत. सगळे दरावाजे आणि खिडक्या आतून बंद होत्या. दोघांचे हात समोरच्या बाजूला बांधण्यात आले होते. या दोघांचे मृतदेह आम्ही शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचं कारण कळू शकणार आहे. तसंच आम्हाला त्यांच्या घरात कुठलीही सुसाईड नोटही आढळलेली नाही. या दोघांच्या लग्नाला एक वर्षही पूर्ण झालं नव्हतं. आम्ही या दोघांचे मोबाइल ताब्यात घेतले आहेत. त्यातल्या मेसेजेसवरुन काही धागेदोरे मिळतात का? हे आम्ही शोधत आहोत. या दोघांनीही प्रेमविवाह केला होता अशी माहितीही मिळते आहे. आता नेमकं या दोघांचं असं का झालं याचा शोध आम्ही घेत आहोत असं पोलिसांनी म्हटलं आहे.