पिंपरी : काळेवाडी परिसरात एका तरुणाने रिक्षाचालकाच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली. पोलिसांना बोलावल्याचे सांगितल्याने संतापून रिक्षाचालकावर ब्लेडने वार केले. तसेच कोयता काढून दहशत निर्माण केली. ही घटना ७ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास गणराज कॉलनी, आदर्शनगर, काळेवाडी येथे घडली.प्रेम ऊर्फ सोन्या बालाजी पोतदार (२३, सांगवी) यास अटक करण्यात आली आहे. मधुकर विष्णु तमाके (५६, काळेवाडी) यांनी याबाबत काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुकर यांच्या घरासमोर प्रेम शिवीगाळ केली. पोलिसांना बोलवतो असे सांगताच त्याने ब्लेडने मधुकर यांच्या डाव्या हनुवटीवर व कपाळावर वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर दुचाकीवर लावलेला कोयता काढून हवेत फिरवत ‘मी इथला भाई आहे, तुम्हाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली व परिसरात दहशत माजवत पळून गेला.
खंडणी प्रकरणी भोसरीतून एकास अट
भोसरीतील चक्रपाणी वसाहतीत एका दुकानदाराकडे दरमहा खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत कोयता दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. शिवशंकर ऊर्फ दाद्या संभांजी राक्षे (वय ३२, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी व्यावसायिकाने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे चक्रपाणी वसाहत येथे गॅस दुरुस्तीचे दुकान आहे. दुकान चालविण्यासाठी आरोपीने मार्च २०२४ पासून दरमहा १२०० रुपये खंडणी मागितली होती. १ जुलै रोजी त्याने कोयता दाखवून एक रुपये ऑनलाइन घेतले. आतापर्यंत आरोपीने २० हजार २०० रुपये जबरदस्तीने घेतले असून परिसरात दहशत पसरवली होती.
परवानगीशिवाय जनावरांची वाहतूक
पुनावळे परिसरात एका ट्रकमध्ये परवानगीशिवाय व चारा-पाण्याची व्यवस्था न करता ३२ जनावरांची वाहतूक करताना एक ट्रक चालक आढळून आला. ही घटना ८ जुलै रोजी पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आली.पोलीस शिपाई दिलीप शंकर साबळे (३२) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या ताब्यातील ट्रकमध्ये ९६ हजार रुपये किमतीची ३२ जनावरे कुठल्याही वैध परवान्याविना व अन्न-पाण्याशिवाय दाटीवाटीने भरलेली आढळून आली. या प्रकरणी प्राण्यांच्या छळविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
सेवानिवृत्त व्यक्तीची २० लाखांची फसवणूक
सेवानिवृत्त व्यक्तीला पेन्शन चालू करण्याच्या बहाण्याने मोबाइलवर ओटीपी घेत सहा बँक खात्यांवर तब्बल २० लाख रुपये ट्रान्सफर करून निवृत्त व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना देहूरोड परिसरात घडली.
जगदीशचंद्र बनिक (६०, देहुरोड) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीस फोन करून पेन्शनसाठी अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. नंतर सहा बँक खाते व्यक्तीच्या बँक खात्याशी जोडण्यास सांगितले. व्यक्तीकडून ओटीपी घेऊन खात्याशी लिंक केलेल्या चार खात्यांमध्ये प्रत्येकी ५ लाख रुपयांची रक्कम फिर्यादीच्या बँक ऑफ इंडिया खात्यातून ट्रान्सफर केली. या प्रकारात एकूण २० लाखांची फसवणूक झाली आहे.