पुणे : पर्वती दर्शन भागात कच्छी दाबेलीविक्रेत्या तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. पोलिसांनी पसार झालेल्या दिनेश प्रभाकर क्षीरसागर (वय ३५, रा. यवतमाळ) याला अटक केली आहे. खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दानिश सिद्दिकी (वय २५, रा. पर्वती दर्शन) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दानिश हा त्याचा भाऊ, त्याची पत्नी यांच्यासह काही वर्षांपासून पर्वती दर्शन भागात राहायला आहे. पर्वती दर्शन भागातच हातगाडीवर कच्छी दाबेली विक्री करतो. सिद्दिकी कुटुंबीय मूळचे उत्तर प्रदेशातील आहे. पर्वती दर्शन यंग सर्कलजवळ दानिश याचे घर आहे. सोमवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास दानिश याच्या घराचा दरवाजा उघडा होता. हल्लेखोर त्याच्या घरात शिरला. हल्लेखोराकडे चाकू होता. दानिशने त्याला पकडले. दोघांमध्ये झटापट झाली. त्यात हल्लेखोराने चाकूने दानिशच्या गळ्यावर वार केला. दानिश रक्ताच्या थारोळ्यात काेसळला. दानिशला गंभीर जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले.
पसार झालेल्या हल्लेखोराला रहिवाशांनी पकडले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. हल्लेखोराची पोलिसांनी चौकशी केली. हल्लेखोराने दानिशचा खून का केला, यामागचे कारण समजू शकले नाही. प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पर्वती दर्शन पोलिसांनी दिली.
वडिलांकडून मद्यपी मुलाचा खून
दारू पिऊन शिवीगाळ केल्याने मद्यपी मुलाचा वडिलांनी खून केल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील वडकी गावात रविवारी रात्री घडली. या प्रकरणी वडिलांना अटक करण्यात आली. प्रशांत सुरेश जमदाडे (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुरेश बाबूराव जमदाडे (वय ५९, रा. कैलासनगर, वलवा वस्ती, वडकी, हवेली) यांना अटक करण्यात आली आहे.
फुरसुंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत मद्यपी होता. दारू पिऊन तो आई-वडिलांना शिवीगाळ करायचा. रविवारी रात्रीही त्याने शिवीगाळ केली. चिडून वडिलांनी त्याला मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. बेशुद्धावस्थेतील प्रशांतला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.