पुणे: सराईत गुन्हेगार असलेल्या भावाने लहान भावावर कोयत्याने वार केल्याची घटना कोथरुडमधील हॅपी काॅलनी परिसरात घडली. गुन्हेगार आणि त्याच्या पत्नीचे वाद सुरू असताना लहान भावाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याने त्याच्यावर शस्त्राने वार करण्यात आले. या प्रकरणी रवि शाम वाघमारे (वय ३०, रा. हॅपी काॅलनी, गोसावी वस्ती, कोथरुड) याला अटक करण्यात आली आहे. सचिन शाम वाघमारे (वय २१, रा. हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कोथरुड) याने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>> पुण्यात पोस्टर वॉर!; उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटाला पोस्टरद्वारे प्रत्युत्तर
रवि वाघमारे सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत. परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी त्याला गेल्या वर्षी शहरातून एक वर्षांसाठी तडीपार केले होते. तडीपार कारवाईचा कालावधी संपल्यानंतर तो तीन महिन्यांपूर्वी शहरात आला होता. रवि आणि त्याच्या पत्नीत वाद झाला. त्या वेळी लहान भाऊ सचिनने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. भांडणात मध्यस्थी केल्याने चिडलेल्या रविने सचिनवर कोयत्याने वार केला. त्याला शिवीगाळ करुन मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.