पुणे : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाने चाकूने भोसकून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वानवडीतील लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात (एएफएमसी) ही घटना घडली. तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी समाज माध्यमातून आई-वडिलांना चिठ्ठी पाठविल्याची उघडकीस आले आहे. ताणतणाव, तसेच नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या तरुणावर गेल्या वर्षभरापासून उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.आत्महत्या केलेला तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होता. आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेसाठी तो ८ मे रोजी पुण्यात आला होता. वानवडीतील लष्कराच्या महाविद्यालयाच्या मैदानावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी (१२ मे) पहाटे त्याने एएफएमसीच्या वसतिगृहातील प्रसाधनगृहात स्वत:वर चाकूने वार करून आत्महत्या केली.
तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी आई-वडिलांना समाजमाध्यमातून चिठ्ठी पाठविली. त्याने समाज माध्यमातील स्टेटसवर चिठ्ठी ठेवली होती. गेल्या वर्षभरापासून तो नैराश्यात होता. त्याच्यावर उपचार सुरू होतो, अशी माहिती त्याच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्यांनी दिली. या घटनेची माहिती पोलिसांनी तरुणाच्या आई-वडिलांना दिली.तरुणाने आई-वडिलांना चिठ्ठी पाठविल्यानंतर त्यांनी त्वरित पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली. पोलिसांना ही माहिती मिळाली. मात्र, तोपर्यंत त्याने आत्महत्या केली होती, अशी माहिती वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने यांनी दिली.
या तरुणाने सोमवारी पहाटे वसतिगृहातील प्रसाधनगृहात चाकूने भोसकून घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली, तेव्हा तो प्रसाधनगृहात रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पोलिसांनी एएफएमसीतील वैद्यकीय तज्ज्ञांना ही माहिती दिली. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गाेडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने यांनी घटनास्थळी भेट दिली.
‘ऑनलाइन’ चाकू खरेदी
अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने तरुण नैराश्यात होता. नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक चौकशीत त्याने ऑनलाइन पद्धतीने चाकू खरेदी केला होता, अशी माहिती मिळाली आहे. वानवडी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.