दुकानाच्या छतावरून जाणाऱ्या वीजवाहिनीच्या धक्क्याने तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना हडपसर भागातील हांडेवाडी परिसरात घडली. या घटनेत मृत्युमुखी पडलेला तरुण दुकानाच्या छताजवळ असलेल्या झाडावर बोरे काढत होता. जुनेद शब्बीर शेख (वय ३५, रा. गोपाळपट्टी, मांजरी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा- पुणे : दुचाकीच्या स्टीकरवरुन लागला चोरट्याचा माग; कोंढव्यातील ३७ लाखांची घरफोडी उघड
जुनेद बेरोजगार आहे. तो मंगळवारी कामाच्या शोधात हडपसर भागातील हांडेवाडी परिसरात आला होता. हांडेवाडी रस्त्यावर श्रीराम चौकाजवळ एका मटण विक्री दुकानाच्या परिसरात बोरांचे झाड आहे. जुनेद दुपारी बाेरे काढण्यासाठी दुकानाच्या पत्र्यावर चढला. त्या वेळी वीजवाहिनीचा धक्का बसल्याने तो बेशुद्ध पडला. जुनेदला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तो मरण पावला. श्रीराम चौकाजवळ दुकाने आहेत. या दुकानांच्या छतापर्यंत बोराच्या झाडाच्या फांद्या पोहोचल्या आहेत. त्या वेळी छतावर असलेल्या वीजवाहिनीच्या धक्क्याने जुनेदचा मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक चाैकशीत मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.