पुणे : महागड्या दुचाकीवरुन फिरण्याची हौस पूर्ण करण्यासाठी पुण्यात रोजगाराच्या शोधात आलेल्या एका तरुणाने दुचाकी चोरल्याचे उघड झाले आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी बीडमधील एका तरुणास अटक केली असून त्याच्याकडून एक महागडी दुचाकी जप्त केली आहे. संदीप संपत आंधळे (वय २३, रा. घुलेनगर, मांजरी, हडपसर, मूळ रा. लिंबोरी, ता. आष्टी, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आंधळे पुण्यात रोजगाराच्या शोधात आला होता.
हेही वाचा >>> पुणे : पीएमआरडीएकडून मुळशीतील जांबे गावात अनधिकृत बांधकामांवर हातोडा
शहरात महागड्या दुचाकीवरुन फिरण्याची त्याला हौस होती. त्यामुळे त्याने काही दिवसांपूर्वी भारती विद्यापीठ भागातून एक दुचाकी चोरली. दुचाकी चोरुन पसार झालेला आंधळे सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळून आला होता. भारती विद्यापीठ पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला. आंधळेला सापळा लावून पोलिसांनी पकडले. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय पुराणिक, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, चेतन गोरे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सचिन सरपाले आदींनी ही कारवाई केली.