पुणे : ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी युवकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील खराडी भागात घडली. याप्रकरणी ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.सिद्धार्थ हुल्लाजी घावटे (वय १९, रा. साडेसतरानळी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत त्याचा मित्र सूरज राठोड (वय २७, रा. आव्हाळवाडी, वाघोली, नगर रस्ता) याने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सूरज आणि त्याचा सहप्रवासी मित्र सिद्धार्थ हे नगर रस्त्यावरील खराडी भागातून गुरुवारी (२२ मे) रात्री साडेदहाच्या सुमारास निघाले होते. त्या वेळी खराडी बायपास चौकात दुचाकीला पाठीमागून ट्रॅक्टरने धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी सिद्धार्थ गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले तपास करत आहेत.

रस्ते अपघातात सहा जणांचा मृत्यू

आठवडाभरात शहरात वेगवेगळ्या भागांत अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. कोंढवा भागात भरधाव मोटारीच्या धडकेत निवृत्ती बाजीराव किसवे (वय १३, रा. कोंढवा) याचा गेल्या रविवारी (१८ मे) सायंकाळी मृत्यू झाला होता. शनिवारी (१७ मे) दुपारी डंपरच्या चाकाखाली सापडून दुचाकीवरील सहप्रवासी शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना खराडी भागात घडली. अपघातात अंशुमन अनुपमकुमार गायकवाड (वय ११, रा. केशवननगर, मुंढवा) याचा मृत्यू झाला. त्यानंतर सोमवारी (१९ मे) रात्री कोथरूडमध्ये भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहप्रवासी अबीर पानसे या बारा वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. नगर रस्ता, येरवडा भागात दोन दिवसांपूर्वी वेगवेगळ्या अपघातांत पादचारी दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला होता.